
बारमध्ये नाचत असलेल्या भांडणादरम्यान 29 वर्षांच्या थेरसी सोपर नावाच्या महिलेने दुसऱ्या महिलेच्या तोंडावर लाथ मारली होती. सोपरने अत्यंत धारदार असलेले हिल्स घातले होते, ज्यामुळे पीडित महिला जबरी जखमी झाली होती. जेव्हा बारमधल्या बाऊन्सरनी सोपरला बाजूला केलं तेव्हा तिला घडल्या प्रकाराबद्दल अजिबात पश्चाताप झाला नव्हता ‘ती त्याच लायकीची आहे’ असं म्हणत तिने या हल्लाचं समर्थन केलं होतं. या प्रकरणी सोपर हिला 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
11 जानेवारी 2020 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास इंग्लंडमधील डॉनकास्टर भागात असलेल्या जॅक्विस बारमध्ये बरीच लोकं दारू प्यायला आणि नाचायला जमली होती. सोपर ही नाचायला उतरली आणि तिने वेड्यावाकड्या पद्धतीने नाचायला सुरुवात केली. तिच्या या नाचाचा त्रास होत असल्याने पीडित महिलेने तिला नीट नाचायला सांगितले होते. यावरून दोघींत वाद झाला होता. वाद वाढत असल्याचं पाहून एका माणसाने दोघींमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी सोपरने त्याच्या आडून पीडितेला बऱ्याच शिव्या दिल्या होत्या. सोपर इतक्यावरच थांबली नाही, तिने पीडितेच्या तोंडावर जोरात बुक्का मारला. यानंतर सोपरने तिच्या तोंडावर लाथही मारली. हिल्सवाले बूट घालून आलेल्या सोपरची लाथ पीडितेच्या तोंडावर बसली होती. यामुळे तिला नाकाला बरीच इजा झाली होती. या हल्ल्यामुळे पीडितेचं नाक कामातून गेलं होतं, ते परत सुस्थितीत आणण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली. तरीही तिच्या नाकावर जखमेचे व्रण राहणार आहेत. इतकंच नाही तर या हल्ल्यात पीडितेचा दातही तुटला होता, जो तिला पुन्हा बसवावा लागला होता.
शेफील्ड क्राऊन कोर्टात सोपरविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. घटनेची सीसीटीव्ही दृश्ये पाहिल्यानंतर आणि साक्षीपुरावे तपासल्यानंतर न्यायधीशांनी सोपर ही दोषी असल्याचा निर्णय घोषित केला होता. यानंतर त्यांनी सोपर हिला 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. लाथ मारल्यानंतर अजिबात खेद वाटत नसलेल्या सोपरला न्यायालयात मात्र तिने केलेल्या कृत्याबद्दल लाज वाटायला लागली होती. तिच्या वकिलांनी तसं न्यायालयालाही सांगितलं होतं. सोपरला उशिराने झालेला पश्चाताप तिच्या कामी आला नाही कारण तिला आता 15 महिने तुरुंगवास भोगावाच लागणार आहे