‘हे’ तीन दिग्गज खेळाडू आयपीएलनंतर करु शकतात क्रिकेटला अलविदा

44

सामना ऑनलाईन । मुंबई

इंडियन प्रिमियर लीग ( आयपीएल) ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आलीय. या स्पर्धेत ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर यासारख्या तरुण तुर्कांनी आपली छाप पाडलीय. मात्र त्याचवेळी काही वरिष्ठ खेळाडू सपशेल फेल ठरलेत. आपली छाप पाडण्यात अपयशी ठरलेल्या या खेळाडूंचे पुढील भवितव्य अनिश्चित असून ते कदाचित क्रिकेटला अलविदा करण्याची शक्यता आहे.

 

yuvraj

युवराज सिंह

दुखापत आणि फॉर्मशी झगडणाऱ्या युवराज सिंहसाठी वर्ल्ड कपपूर्वी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आयपीएल ही सर्वोत्तम संधी होती. मात्र ही संधी त्याला साधता आली नाही. युवराजने या स्पर्धेतील ८ सामन्यात अवघ्या १०.८३ च्या सरासरीने फक्त ६५ धावा काढल्या. २० ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. खराब फॉर्ममुळे युवराजला तब्बल ६ सामने संघाच्या बाहेर बसावे लागले.

एकाच ओव्हरमध्ये ६ सिक्सर्स मारण्याचा विक्रम असलेल्या युवराजला संपूर्ण स्पर्धेत फक्त २ सिक्सर्सच मारता आले. ‘२०१९ च्या वर्ल्ड कपनंतर करियरबाबत विचार करु,’असे वक्तव्य युवराजने केले होते. मात्र त्याचा धावांचा दुष्काळ पाहता पुढील आयपीएल युवराज खेळण्याची शक्यता कमीच आहे.

chris-gayle

ख्रिस गेल

स्वत:ला टी-२० क्रिकेटचा बॉस समजणाऱ्या ख्रिस गेलला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलाच नाही. गेलने सुरुवात धडाकेबाज केली होती. पहिल्या ५ लढतीमध्ये एका शतकासह ३०२ धावा काढणाऱ्या गेलने नंतरच्या ६ सामन्यात फक्त ६६ धावा केल्या.

पंजाबला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी शेवटची लढत मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक होते. या निर्णायक लढतीमध्ये गेल दुसऱ्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाला. गेलला सुरुवातीला कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नव्हती. पंजाबने अगदी शेवटच्या क्षणी त्याला खरेदी केले. गेल आता ३८ वर्षांचा झाला आहे. त्याचा फिटनेसही पूर्वीसारखा राहिलेला नाही. फिल्डिंग करताना किंवा रन घेताना त्याला लंगडताना अनेकांनी पाहिले आहे. त्यामुळे पुढील आयपीएलपूर्वी आपल्या क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम देऊ शकतो.

gautam-gambhir-dd

गौतम गंभीर

दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या टीममध्ये मोठ्या अपेक्षेने दाखल झालेल्या गौतम गंभीरसाठी आयपीएलचा हा सिझन निराशाजनक राहिला. गंभीरने ६ लढतीत फक्त ८५ धावा केल्या. खराब प्रदर्शानामुळे गंभीरने दिल्लीचे कर्णधारपद सोडले आणि नंतर एकही मॅच खेळली नाही. गंभीरचे वय सध्या ३६ आहे. तसेच तो मोठ्या कालखंडापासून टीमच्या बाहेर आहे. त्यामुळे २०१९ मध्ये गंभीर क्रिकेटला अलविदा करण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या