भ्रष्टाचार जनतेसमोर येऊ नये म्हणूनच राडा; आदित्य ठाकरे भरपावसात भिडले

मालवणच्या राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भारतीय जनता पक्ष आणि मिंध्यांच्या भ्रष्टाचारामुळेच कोसळला आणि तो भ्रष्टाचार जनतेसमोर येऊ नये म्हणून आज तिथे जाणीवपूर्वक राडा घडवण्यात आला, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. मालवण येथील आक्रोश मोर्चाला भरपावसात मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे मिंधे सरकारवर बरसले. आजचा राडा गृहमंत्र्यांनी घडवून आणला का, असा सवाल करतानाच, मिंधे सरकार गाडण्यासाठी सज्ज रहा, आजपासून प्रत्येक दिवस हे भ्रष्ट सरकार गाडण्यासाठीच द्यायचा आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जगात समुद्रकिनारी अनेक पुतळे आहेत. अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा तर 138 वर्षे जुना आहे, मग अवघ्या आठ महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निकृष्ट कसा झाला, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. महाराजांच्या पुतळ्यात भाजप चोरी करू शकते हे आकलनाच्या पलीकडचे आहे. या भ्रष्टाचारी सरकारने महाराजांना देखील सोडले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

समोरून अफझल येतील, आम्ही लढायला तयार

समोरून अनेक अफझल येतील. ईडी, सीबीआय आणतील. पण आम्ही झुकणार नाही, आम्ही लढायला तयार आहोत असे खुले आव्हानच आदित्य ठाकरे यांनी आज मिंधे सरकारला दिले. दिल्लीतले काही नेते घाबरवण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगा की आम्ही दिल्लीसमोर झुकणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगितले.

कॉन्ट्रक्ट नेमकं कोणाला दिले हे जगासमोर आलेच पाहिजे

मालवण येथील शिवपुतळ्याचे कॉन्ट्रक्ट भाजपाने, मिंधे सरकारने कोणाला दिले होते, हे जगासमोर आले पाहिजे. कोण होते जयदीप आपटे? कोणताही अनुभव नसताना तुम्ही हे काम त्यांना कसे दिले? हे आपटे कोण आहेत?  कुठे आहेत?  हे आम्हाला कळाले पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आपटे कुणाचा तरी मित्र आहे म्हणून त्यांना काम मिळाले का याची माहिती जनतेला मिळाली पाहिजे, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला मोदींचा विरोध का?

आदित्य ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने चार वर्षापूर्वी संभाजीनगर येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नाव दिले आहे, पण मोदी सरकारने अजूनही या नावाला मान्यता दिलेली नाही. त्यांचा महाराष्ट्रातील या नावांना विरोध का आहे? त्यांना महाराष्ट्रद्वेष का आहे? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

चिंधीचोरांकडे लक्ष देत नाही

आदित्य ठाकरे यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे यांचा चांगलाच समाचार घेतला. महाविकास आघाडीच्या मोर्चावेळी काही चिंधीचोर आले होते, मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही. आज बालिशपणा होत होता. हा भाजपचा भ्रष्टाचार आहे. इकडचे स्थानिक खासदार कसे जिंकून आले आहेत हे कोकणवासियांना माहिती आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

भाजपने केलेल्या सर्वच कामांना गळती

आदित्य ठाकरे यांनी यावेळी केंद्रातील भाजपा सरकारवरही टीका केली. महाराजांच्या किल्ल्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असेल तर आपण तिथे गेलं पाहिजे या भावनेने मी इथे आलो. कारण आपण महाराष्ट्राच्या मातीतील लोक आहोत. पण पाहिलं तर अशी परिस्थिती संपूर्ण देशात आहे. गेल्या दहा वर्षांत भाजपाने जी काम केली आहेत, त्या कामांना गळती लागली आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. देशात कोणताही एक भाग नाही जिथे भाजपाने भ्रष्टाचार केलेला नाही. मुंबईची मेट्रो असो, मुंबई महापालिकेतील घोटाळे असो. अयोध्येमधील राम मंदिरातही गळती लागली आहे. नवीन संसद भवनातही पाणी गळत आहे. दिल्ली विमानतळाचे छतही पडले आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.