सशस्त्र दरोडेखोरांच्या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्य़ासह दोघे जखमी, चार दरोडेखोर गजाआड

नगर जिल्ह्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच या टोळीने हल्ला केला. यात एका पोलीस कर्मचाऱ्य़ासह एक ग्रामस्थ जखमी झाल्याची घटना बोटा गावांतर्गत असलेल्या माळवाडी येथे बुधवारी पहाटे घडली आहे. दरम्यान, हल्ला झाल्यानंतरही पोलिसांनी चार दरोडेखोरांना अटक केली असून, एकजण फरार झाला आहे. दरोडेखोरांकडून दोन दुचाकींसह दरोडय़ासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

पोलीस नाईक गणेश लोंढे यांच्यासह एक ग्रामस्थ जखमी झाला आहे. जानकू लिंबाजी दुधवडे (वय 22), संजय निवृत्ती दुधवडे (दोघेही रा. गाढवलोळी, अकलापूर, ता. संगमनेर), दत्तू बुधा केदार (वय 19, रा. नांदुर खंदरमाळ, ता. संगमनेर), राजू सुरेश खंडागळे (वय 25, रा. माळवाडी बोटा, ता. संगमनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, भाऊ लिंबा दुधवडे (वय 25, रा. गाढवलोळी, अकलापूर) हा फरार झाला आहे.

घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय विखे, पोलीस नाईक गणेश लोंढे, राजेंद्र लांघे, कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे, किशोर लाड, प्रमोद चव्हाण, गणेश तळपाडे, चालक संतोष फड हे बोटा परिसरातील माळवाडी येथे गस्त घालत होते. त्याचदरम्यान दोन दुचाकींवर पाचजण संशयितरीत्या फिरताना आढळले. पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पोलिसांवर सत्तूरने हल्ला करीत दगडफेक केली. यामध्ये पोलीस नाईक गणेश लोंढे यांच्या गुडघ्याला व हाताला मार लागला असून, एक ग्रामस्थही जखमी झाला आहे. यानंतरही पोलिसांनी चौघांना पाठलाग करून पकडले.

याप्रकरणी पोलीस नाईक गणेश लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी वरील पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या