नवरीला भेटणे पडले पाच लाख रुपयाला, कराडमध्ये साखरपुड्यात चोरट्यांनी केली पर्स लंपास

साखरपुड्यात नवरीसोबत फोटो काढून परत येईपर्यंत शेजारच्या खुर्चीवर ठेवलेली पाच लाख किमतीच्या 14 तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची पर्स चोरट्यांनी लंपास केली. एका हॉटेलच्या लॉनवर ही घटना घडली. साखरपुड्याच्या कार्याक्रमात शिरून चोरट्यांनी दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. सविता सुधीर पाटील (रा. वारुंजी विमानतळ) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सविता पाटील यांच्या नातेवाईकाचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता. यासाठी त्या गेल्या होत्या. मुलाच्या दुचाकीवरून गेल्याने त्यांनी त्यांच्या सोन्याच्या बांगड्या, ब्रेसलेट पर्समध्ये काढून ठेवले होते.

साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना सविता यांच्या नणंदेची मुलगी ऋतुजाने तिच्या भावाची अंगठी पर्समध्ये ठेवण्यास दिली. त्यानंतर साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास सविता त्यांची पर्स शेजारच्या सोफ्यावर ठेवून नवरीसोबत फोटो काढण्यास गेल्या.

फोटो काढून येईपर्यंत कोणीतरी त्यांची पर्स लांबवली होती. पर्सबाबत त्यांनी पाहुण्यांना विचारले. त्यावेळी काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

पर्समध्ये सुमारे चार लाख 20 हजारांच्या सहा बांगड्या, 35 हजारांचे एक तोळ्याचे ब्रेसलेट, 25 हजारांची सात ग्रॅम वजनाची अंगठी असा सुमारे चार लाख 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरीला गेली आहे. सविता पाटील यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वामी करीत तपास आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या