डिलिव्हरी बॉयच्या वेषात नगरमध्ये चोऱयांचे सत्र; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद; पोलिसांसमोर आव्हान

 ‘डिलिव्हरी बॉय’च्या वेशात भरदिवसा निवासी इमारतींमध्ये घुसून घरफोडी करणाऱया चोरटय़ांनी नगर शहरासह उपनगरांत उच्छाद मांडला असून, चोऱयांच्या सत्राने नगरकर धास्तावले आहेत. अनेक घटनांमध्ये चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यामुळे चोरटय़ांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

नगर शहर आणि उपनगरांत गेल्या काही दिवसांपासून भरदिवसा बंद घरे, अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून घरफोडी होण्याचे सत्र सुरू आहे. पोलिसांनी जंगजंग पछाडूनही अनेक घरफोडींचे गुन्हे उघडकीस आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मंगळवारी (दि. 11) दुपारी कायनेटीक चौकाजवळील साईश्रद्धा अपार्टमेंटमध्ये, त्यानंतर केडगावच्या मोतीनगर भागातील राज अपार्टमेंटमध्ये घरफोडी झाली होती. या दोन्ही ठिकाणच्या घरफोडींच्या तक्रारी देण्यासाठी संबंधित तक्रारदार कोतवाली पोलीस ठाण्यात आल्यावर पोलिसांनी दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोन्ही ठिकाणी घरफोडी करणारा चोरटा एकच असल्याचे दिसून आले.

केडगावमधील मोतीनगर येथील राज अपार्टमेंटमध्ये राहणाऱया मीना राम दहिवळ या गृहिणी मुलाला शोधण्यासाठी घर बंद करून गेल्या असता, चोरटय़ाने घरातील सोन्याचे दागिने व 20 हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. मीना दहिवळ तक्रार देण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात गेल्या तेव्हा तेथे साईश्रद्धा अपार्टमेंटमधील कासार हे तक्रार देण्यासाठी आले. त्यांच्या फ्लॅटमध्येही दुपारीच चोरी झाली होती. दोन्ही चोरी एकाच दिवशी झाल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱयांची पाहणी केली. यावेळी दोन्ही ठिकाणी चोरटा एकच असून, तो डिलिव्हरी बॉयच्या वेशात आल्याचे दिसून आले.

भरदिवसा शिक्षकाचे घर फोडले

पोलिसांकडून दिवसा घरफोडी करणाऱया टोळीचा शोध सुरू असतानाच, कल्याण रोडवरील समतानगर येथील साईपार्क अपार्टमेंटमध्ये शिक्षकाचा बंद असलेला फ्लॅट अज्ञात चोरटय़ांनी फोडल्याची घटना मंगळवारी (दि.11) दुपारी घडली. याबाबत विजय शंकर घिगे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महागडय़ा दुचाकीवर ऐटीत एण्ट्री

राष्ट्रवादी भवनाशेजारील साईश्रद्धा अपार्टमेंटमध्ये मंगळवारी (दि. 11) दुपारी महागडय़ा क्रमांक नसलेल्या केटीएम दुचाकीवरून ब्रँण्डेड कपडे आणि गॉगल अशा वेशात व पाठीवर मोठी बॅग असलेला तरुण आला. त्याने पार्ंकगमध्ये दुचाकी लावली व लिफ्टने पाचव्या मजल्यावर गेला. तेथे पाहणी करत तो जिन्याने दुसऱया मजल्यावर आला. त्या मजल्यावरील कासार यांच्या फ्लॅटच्या सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून लाकडी दरवाजा उचकटून आत गेला व अवघ्या 10 मिनिटांत पार्ंकगमधून दुचाकी काढून तेथून निघून गेला. असाच प्रकार केडगावच्या मोतीनगरमध्येही घडल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी बारकाईने तपास सुरू केल्यावर डिलिव्हरी बॉयच्या वेशात दिवसा घरफोडी करणारी एक टोळीच शहरात कार्यरत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या टोळीचा कसून शोध सुरू केला आहे.