काळोख्या रात्री खवळलेल्या समुद्रात चोरांची लुटमार

सामना ऑनलाईन । मुंबई

समुद्र खवळल्यामुळे पोलिसांनी दोन दिवस गस्त थांबवली होती. तर बुचर आयलॅण्ड येथील जेट्टी-५ चे बांधकाम थांबवून कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली. त्या दिवशी समुद्राने रौद्ररूप धारण केले होते. पण अशाही परिस्थितीत उरण-मोहरामध्ये राहणाऱ्या चोरटय़ांनी काळोख्या रात्री खवळलेल्या समुद्रात उतरून चार लाख रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेले, पण तरीही यलोगेट पोलिसांनी त्यांना पकडले.

मुंबईपासून खोल समुद्रात बुचर आयलॅण्ड येथील जेट्टी नंबर- 4 वर प्रचंड भार पडत असल्याने तेथे बाजूलाच जेट्टी नंबर-५ उभारण्याचे काम सुरू आहे. ५ व ६ जुलै रोजी समुद्र प्रचंड खवळला होता. मोठमोठय़ा लाटा उसळत होत्या. त्यामुळे यलोगेट पोलिसांनी गस्त थांबवली होती, तर कर्मचाऱ्यांचे काम थांबवले होते. उरण मोहरा येथे राहणाऱ्या चोरांनी नेमकी हीच संधी साधली. उसळलेल्या लाटा अंगावर घेत त्यांनी जेट्टी नंबर-५ गाठली आणि चार लाखांचा मुद्देमाल बोटीतून चोरून नेला. ७ तारखेच्या सकाळी सुपरवायझरच्या नजरेस चोरीचा प्रकार पडताच त्याने यलोगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेखा कपिले, पोलीस निरीक्षक संजय करंबे, अंमलदार राऊत, सूर्यकांत देवगुडे, सय्यद, टिळक या पथकाने खबऱ्यांना कामाला लावून तपास सुरू केला.

दोन रात्रीत हे चोरले
मोठे लोखंडी पाइप, तीन बॅटऱ्या, ११ ऑक्सिजन सिलिंडर, ४ डी शॅकल, ४० टी पाइप, १९ मीटरची रोप, वेल्डिंग कॉपर वायर, टी हेड पाइप, १८० लिटर हायस्पीड डिझेल असा ३ लाख ९५ हजार किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. त्यापैकी तीन लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

– संजय करंबे व त्यांचे पथक कसून तपास करीत असताना उरण येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गौरख कोळी (२७) याचे नाव समोर आले. गौरखने चोरी केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याचा साथीदार मुन्ना शेख (२५) याला बेडय़ा ठोकल्या. त्यांचे अन्य चार साथीदार अद्याप सापडलेले नाही. आरोपींनी चोरीचा मुद्देमाल उरणच्या समुद्रातील दलदल आणि खारफुटीच्या परिसरात लपवून ठेवला होता. तो सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

– गौरख याच्या विरोधात विनयभंग आणि तेलचोरीचा गुन्हा दाखल आहे. गौरखची उरणमध्ये प्रचंड दहशत आहे. समुद्रातील तेलमाफियांकडून वसुलीचे काम गौरख करतो, असे पोलीस सूत्रांकडून समजते.