दर्जेदार चित्रपटांची पर्वणी, प्रभादेवी येथे 12 डिसेंबरपासून थर्ड आय आशियाई महोत्सव

एशिअन फिल्म फाऊंडेशनतर्फे आयोजित थर्ड आय आशियाई महोत्सवात गाजलेल्या चित्रपटांची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. 12 ते 18 डिसेंबर दरम्यान पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये आयोजित या महोत्सवात इराण, बांगलादेश, श्रीलंका अशा विविध आशियायी देशांमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले 30 चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या महोत्सवाचा शुभारंभ सरथ कोथालावाल आणि कुमारा थिरीमदुरा दिग्दर्शित ‘द न्यूजपेपर’ या श्रीलंकन सिनेमाने होणार आहे. सांगता समारंभात अनिक दत्ता दिग्दर्शित ‘अपराजितो’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. सुधीर नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या महोत्सवाचे हे 19 वे वर्ष आहे. पंट्री पह्कस विभागात सहा श्रीलंकन चित्रपट प्रदर्शित केले जाणार असून प्रथमच गुजराती चित्रपटांचा विशेष विभाग या महोत्सवात असणार आहे. हेल्लारो हा चित्रपट खास आकर्षण असणार आहे.

महोत्सवात फनरल, गोदाकाठ, काळी माती, भारत माझा देश आहे, फास हे मराठी चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. दिवंगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना श्रद्धांजली म्हणून डॉ. संतोष पाठारे दिग्दर्शित ‘सुमित्रा भावे एक समांतर प्रवास’ हा माहितीपट प्रदर्शित करण्यात येईल.