हॅण्डस्कोम्ब-मार्श जोडीने वाचवली रांची कसोटी, कांगारूंना गुंडाळण्यात हिंदुस्थानी अपयशी

21

सामना ऑनलाईन,रांची
तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी हिंदुस्थानने विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र, शॉन मार्श (५३) आणि पीटर हॅण्डस्कोम्ब (नाबाद ७२) यांनी मोक्याच्या वेळी झुंजार फलंदाजी केल्याने ऑस्ट्रेलियाने १०० षटकांत ६ बाद २०४ धावांपर्यंत मजल मारून रांची कसोटी वाचविण्यात यश मिळवलं. खेळपट्टीवर ठाण मांडणाऱ्या मार्श-हॅण्डस्कोम्ब जोडीने मिळून तब्बल ३९७ चेंडूंचा सामना केल्याने हिंदुस्थानी गोलंदाजांना कांगारूंना गुडाळण्यात अपयश आले. द्विशतकवीर चेतेश्वर पुजारा सामन्याचा मानकरी ठरला. कसोटी ड्रॉ राहिल्याने चार सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे धर्मशाला येथे होणाऱ्या चौथ्या व अखेरच्या कसोटीत बाजी मारून कोण मालिका जिंकणार, याकडे तमाम क्रिकेटशौकिनांचे लक्ष असेल.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५१ धावसंख्या उभारली. हिंदुस्थानने प्रत्युत्तरादाखल ६०३ धावसंख्या उभारून पहिल्या डावात १५२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर रविवारच्या उर्वरित ७.२ षटकांच्या खेळात कांगारूंनी २३ धावा करताना दोन फलंदाज गमावले होते. रवींद्र जाडेजाने डेव्हिड वॉर्नर (१५) व नॅथन लायन (२) यांच्या दांडय़ा गुल करून चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे टेन्शन वाढवले होते.

रेनशॉ-स्मिथ अपयशी
ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाच्या २ बाद २३ धावसंख्येवरून सोमवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. आघाडीवीर मॅट रॅनशॉ व कर्णधार स्टीव्हन स्मिथ या फॉर्ममध्ये असलेल्या जोडीवरच ऑस्ट्रेलियाची खरी मदार होती. या दोघांनी २१ षटके खेळून काढत धावफलकही हलता ठेवला होता. मात्र, वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने २८व्या षटकांत नांगर टाकलेल्या रेनशॉला पायचीत बाद करून ही जोडी फोडली. पुढच्याच षटकात रवींद्र जाडेजाने पहिल्याच भन्नाट चेंडूवर स्टीव्हन स्मिथला अक्षरशः मामा बनवले. लेग स्टम्पच्या बाहेर पडलेला चेंडू बॅटने खेळण्याऐवजी पॅडवर घेण्याचा स्मिथचा अंदाज चुकला अन् त्याची दांडी गुल झाली. ऑस्ट्रेलियाची २९.१ षटकांत ४ बाद ६३ अशी दुर्दशा झाल्याने हिंदुस्थानच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
ऑस्ट्रेलियन जोडीची शतकी झुंज
रेनशॉ आणि स्मिथ हे भरवशाचे फलंदाज बाद झाल्याने अन् कसोटीचा पाचवा दिवस असल्याने हिंदुस्थानचे फिरकी गोलंदाज ऑस्ट्रेलियाला गुंडाळतील असे वाटत होते. मात्र, शॉन मार्श आणि पीटर हॅण्डस्कोम्ब जोडीने हिंदुस्थानी गोलंदाजांचा प्रतिकार करत ६२.१ षटके खेळून काढताना १२४ धावांची बहुमोल भागीदारी केली. उपाहारानंतर पुढील दोन सत्रं या दोघांनी हिंदुस्थानी गोलंदाजांना यश मिळू दिलं नाही. ड्रिंक्सनंतर जाडेजाने ९२ व्या षटकांत शॉन मार्शला मुरली विजयकरवी झेलबाद केले. मार्शने १९७ चेंडूंत ५३ धावा करताना ७ चौकार लगावले. त्याच्या जागेवर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलला रविचंद्रन अश्विनने (२) मुरली विजयकरवीच झेलबाद केले. मॅक्सवेल गेल्यानंतर हॅण्डस्कोम्बने आलेल्या मॅथ्यू वेडच्या (नाबाद ९) साथीने कसोटी ड्रॉ केली. हॅण्डस्कोम्बने ७२ धावांच्या संयमी खेळीत २०० चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकार लगावले. पहिल्या डावात ५ बळी टिपणाऱया जाडेजाने दुसऱ्या डावातही ४ फलंदाज बाद केले.

आपली प्रतिक्रिया द्या