५ हजार सापांसह प्राण्यांना जीवनदान देणारा प्राणीमित्र

सामना ऑनलाईन । भुवनेश्वर

साप पाहिल्यावर बऱ्याचदा सर्वांचीच घाबरगुंडी उडते. आपण राहत असलेल्या परिसरात साप आला की त्याला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडते मात्र त्याला पकडण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही. मग त्यावेळी त्याला पकडून जंगलात सोडण्यासाठी सर्पमित्रांना बोलावले जातं. मात्र ओदिशामध्ये असा एक सर्पमित्र आहे ज्याने आतापर्यंत तब्बल ५ हजार सापांना जीवनदान दिले आहे. कृष्ण चंद्र गोछायत असं या तरूणाचं नाव आहे. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, कृष्ण चंद्रने आतापर्यंत केवळ ५ हजार सापांनाच नाही तर वाघ, बिबळ्या, हरीण, हत्ती, माकडे यांसारख्या प्राण्यांना तसेच काही पक्षांनाही जीवनदान दिले आहे.

प्राण्यांना मदत केल्यावर म्हणजेच जखमी प्राण्यांवर उपचार करून तसेच संकटात असलेल्या प्राण्यांची सुटका करून मनाला समाधान मिळत असल्याच कृष्ण चंद्रने सांगितलं आहे. जंगलात वन्य प्राणी नसतील तर माणसाचं आयुष्य धोक्यात येईल. त्यामुळे मी मला त्यांना जमेल तितकी मदत करून वन्य जीवांची काळजी घेत असल्याचं ही त्याने म्हटलं आहे. जंगलातील प्राणी मला माझे मित्र वाटतात. तसेच प्राण्यांवर एखादं संकट आलं तर त्यांचा जीव वाचवणे हे कर्तव्य असल्याचं ही कृष्ण चंद्रने सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या