गुंडाझुंडांचे राज्य कोणाचे? हे पाप काँग्रेसनेही केले नव्हते!

243

<< रोखठोक >>    << संजय राऊत >>

पोलीस व सैन्यभरती व्हावी त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष मुंबईसह सर्व जिह्यांत गुंडाझुंडांची भरती करीत गुंडांना निवडून आणू व नंतर सुधारू असे यावर समर्थन केले जात आहे. साधनशूचिता व नैतिकतेचा टेंभा मिरवणारे ‘भाजप’चे लोक कालपर्यंत शिवसेनेला दूषणे देत होते. आज त्यांनीच महाराष्ट्रात चोरांचे राज्य निर्माण केले. चोरांना वाल्मीकीची पदवी देऊन काय होणार?

devendra-and-bapat

महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे? याचे उत्तर भारतीय जनता पक्षाने आता देऊन टाकले आहे. महाराष्ट्र  राज्य भ्रष्ट अजगराच्या जबड्यात आणि गुंडपुंड सापाच्या विळख्यात नेऊन ठेवण्याचे काम सध्याच्या राज्यकर्त्यांनी केले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका आम्ही साम, दाम, दंड, भेद म्हणजेच गुंड व झुंडांच्या मदतीने जिंकू असे भारतीय जनता पक्षाने ठरवले आहे व हाच पक्ष आज छत्रपती शिवाजी महाराजांची सर्रास जास्त जपमाळ ओढताना दिसत आहे. राजकारणात यश प्राप्तीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी ‘दादा’ व गुंडांची मदत आतापर्यंत घेतली आहे. पण ‘दादा’ व ‘गुंड’ यातील फरक काही मंडळींना समजला नाही. काँग्रेसमध्ये पूर्वी बोरकरदादांसारखे लोक होते व स. का. पाटील यांची काँग्रेस अशा दादांची मदत घेत होती. असे दादा हे खून आणि बलात्कारसारख्या गुह्यांचे धनी नव्हते तर आपापल्या भागांतील लोकांचे संरक्षक होते. असे अनेक ‘दादा’ शिवसेना स्थापनेनंतर भगव्याचे शिलेदार बनले. हे मान्य केले तरी त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता व मुंबईच्या रक्षणासाठी ‘दादागिरी’ केली. या सामाजिक दादागिरीवर ज्यांनी सर्वाधिक ‘नाके’ मुरडली त्या भारतीय जनता पक्षाने आता गुंडांचा दाखला पाहूनच त्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असे सांगणाऱ्यांना महाराष्ट्रासह देशभरात गुंडांची मदत निवडणुका जिंकण्यासाठी घ्यावी लागते व गुंडांच्या प्रवेशाचे हे सर्व लोक समर्थन करतात. महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत आहे, असा आक्रोश काही वर्षांपूर्वी करणाऱया भाजप नेत्यांची ही मुक्ताफळे पहा-

‘‘आधी गुंडांना निवडून आणू, मग सुधारू!’’ श्री. सुभाष देशमुख, महाराष्ट्राचे सहकारमंत्री

‘‘गुंडांना पक्षात घेण्यात काहीच गैर नाही. आम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत!’’ गुंडांना, खुनी, बलात्कऱ्याना पक्षात घेतले तर काय बिघडले? श्री. शरद बनसोडे, सोलापूरचे खासदार

हीच जर भारतीय जनता पक्षाची सार्वत्रिक भावना असेल तर देश सुधारण्याची शेवटची आशाही मावळली आहे.

इंदिरा गांधींवर टीका का?

पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत ‘नोटाबंदी’वरून इंदिरा गांधींवर टीका केली व त्यासाठी श्री. माधव गोडबोले यांच्या पुस्तकाचा हवाला दिला. ‘नोटाबंदी’चा प्रस्ताव फेटाळताना ‘‘काँग्रेसला निवडणुका लढायच्या नाहीत काय?’’ असा प्रश्न श्रीमती इंदिरा गांधी यांनी यशवंतराव चव्हाणांना केला. तो आता टीकेचा विषय ठरला! पण त्याहीपेक्षा ‘‘गुंडांना घेतले तर काय झाले? भाजपला निवडणुका जिंकायच्या नाहीत काय?’’ या प्रश्नाचा विषारी खिळा महाराष्ट्राच्या मस्तकात ठोकण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाला आज अनेक गोष्टी व घटनांचे विस्मरण झाले आहे. माजी गृहसचिव एन. एन. व्होरा यांनी राजकारणी आणि गुन्हेगार यांच्या ‘प्रेम’संबंधांबद्दल ५ ऑक्टोबर १९९३ रोजी अहवाल सरकारला सादर केला. तेव्हापासून राजकारणी व गुन्हेगारसंबंधांची चर्चा सुरू झाली व या चर्चेत भाजप पुढे होता. लोकसभेत या ‘प्रेम’संबंधांवर चर्चा झाली तेव्हा ‘‘राजकारणी आणि गुन्हेगार यांचे वाढते साटेलोटे रोखण्यासाठी आवश्यक असलेली राजकीय इच्छाशक्ती या सरकारात म्हणजे काँग्रेसमध्ये नाही,’’ असे प्रतिपादन अनेक खासदारांनी लोकसभेत केले व त्यात भाजपचे लोक आक्रमक होते.

प्रसारमाध्यमे आणि न्यायसंस्था यावरही माफिया टोळ्यांचा प्रभाव असल्याचे निवेदन भाजप खासदार जसवंत सिंग यांनी तेव्हा केले होते. मुंबईतील भूमिगत गुन्हेगारी जगाचा पाकिस्तान कसा उपयोग करून घेतो याचा उल्लेखही त्यांनी केला. दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानचा प्रमुख हस्तक हे मान्य केले की, त्याचे हस्तक हिंदूही आहेत, मुस्लिम नावे घेऊन त्यांनी प्रवास केले आहेत हे विचारात घ्यावे लागते. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीकरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे राज्यमंत्री सलमान खुर्शीद म्हणाले. त्यामुळे भ्रष्टाचार नष्ट झाल्याशिवाय गुन्हेगारांबरोबरचे साटेलोटे संपणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. ‘‘या संसदेतील किती खासदारांनी कायद्यात तरतूद असलेल्या खर्चात आपली निवडणूक लढविली आहे?’’ असे आव्हान त्यांनी या चर्चेत बोलताना दिले. एकूण प्रत्येक खासदार आपली निवडणूक भरपूर आणि बेकायदा खर्च करून जिंकतो. गुन्हेगारांच्या मदतीने मतांचे गठ्ठे गोळा करतो आणि लोकशाहीच्या नावाने कायदे करण्यासाठी संसदेत जाऊन बसतो.

भ्रष्टाचाराने डोक्यावरचे आकाश साफ फाटलेले आहे आणि गुन्हेगारांनी या सुंदर पृथ्वीला आपल्या भयानक कृत्यांसाठी बटीक बनविली आहे अशी आजची परिस्थिती आहे. गुन्हेगाराला निवडणुकीचे तिकीट नाही असा कायदा व्हायला हवा असे सर्व पक्ष म्हणतात, परंतु कुणीही असा कायदा करीत नाही. जोपर्यंत शिक्षा दिली जात नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार म्हणता येणार नाही, असे त्याच्या वतीने सांगितले जाते. पुन्हा गुन्हा केला की शिक्षा होतेच, अशी या देशात स्थिती नाही.

ही जंत्री पहा

बिहारात गुंडांचे राज्य आहे, असे भाजप तेथील विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगत होता. पण लालू यादव यांचा पराभव करण्यासाठी पप्पू यादव या सगळ्यात मोठ्या ‘डॉन’ला हाताशी धरले. भाजपने त्यांच्या पक्षात घेतलेले सर्व गुंड पराभूत झाले व नितीशकुमार आणि लालू यादव जिंकले. त्यामुळे बिहारात गुंडांचे राज्य असल्याचे भाजपचे पालुपद चालूच आहे. भाजपचे गुंड जिंकून राज्य आले असते तर ते नव्या युगातील वाल्मीकी ठरले असते. मुंबईचे पाटणा झाले आहे, अशी तक्रार मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबईच्या प्रचारसभेत केली ती त्याच निराशेतून. निवडणुका जिंकण्यासाठी गुंड घ्यावेत तर ते गुंड पराभूत होतात. जिंकले तर ते मुंबईतील वाल्मीकी ठरतील. उत्तर प्रदेशात ‘यादवां’चे गुंडाराज आहे असे पंतप्रधान मोदी सांगतात. पण यादवांचा पराभव करण्यासाठी उत्तर प्रदेशात भाजपने नामचीन गुंडांची भरती केली व महाराष्ट्रात शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ‘पोलीस’भरतीप्रमाणे गुंडभरती २७ जिल्ह्यांत सुरू केली. आता फक्त दाऊद इब्राहिम, छोटा शकील व टायगर मेमनलाच घ्यायचे बाकी ठेवले. उद्या या त्रिकुटाचेही समर्थन भाजपचे मंत्री करतील व ‘निवडणुका जिंकायच्या आहेत हे करावेच लागेल. टीका करणारे देशद्रोही आहेत’ असा शिक्का मारून हे लोक मोकळे होतील.

कलानी पावन झाले

ज्या कलानी, ठाकुरांच्या विरोधात गोपीनाथ मुंडे यांनी रान उठवले व श्री. शरद पवार यांना बदनाम केले, त्या कलानींचे सुपुत्र चि. ओमी कलानी यांना पत्नीसह भाजपच्या प्रवाहात पावन करून घेतले. श्री. शरद पवार यांना आता पद्मविभूषण दिले. म्हणजे एक तर श्री. मुंडे यांचा पवारांविरुद्धचा प्रचार बनाव होता किंवा आजचे भाजप सरकार निर्वस्त्र होऊन गटारात उतरले आहे. गेल्या काही दिवसांत भाजपने शेकडो गुंडांना प्रवेश देऊन त्यांना पक्षात पदे व उमेदवाऱ्या दिल्या. बाबा बोडके या गुंड प्रवृत्तीच्या माणसाला राष्ट्रवादीने प्रवेश देताच टीका करणारे श्री. फडणवीस होते, पण आता मुख्यमंत्री म्हणून त्यांनीच बोडकेसारख्यांना प्रवेश दिला व मुख्यमंत्र्यांसोबतचे गुंडांचे फोटो नागपूर, पुणे, नाशिकपासून मुंबईपर्यंत प्रसिद्ध होत आहेत. पवन पवार, पिंटू धावडे, श्याम शिंदे, विठ्ठल शेलार यांचा प्रवेश म्हणजे जणू संत-महात्मे यांचा प्रवेश व्हावा अशा ‘मंगलमय’ वातावरणात झाला. खून, खंडणी, दरोडे, बलात्कार, अपहरण यांसारखे गुन्हे या लोकांवर आहेत. असे लोक राज्यकर्त्या पक्षात जाऊन मानमरातब मिळवीत असतील तर महाराष्ट्राचे ‘बनाना रिपब्लिक’ व्हायला कितीसा वेळ लागणार?

शर्मा बंधूंचे काय?

श्री. शरद पवार हे संरक्षणमंत्री असताना कुणी शर्मा बंधू हे संशयित आरोपी त्यांच्या विमानात चढले म्हणून महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी तेव्हा काय गहजब केला! पण शर्मा बंधू फक्त विमानात चढले. आजचे नवे शर्मा बंधू मुख्यमंत्र्यांच्या व इतर मंत्र्यांच्या व्यासपीठावर व शासकीय निवासस्थानी जात आहेत. त्यातले बरेचसे भाजप उमेदवार बनले आहेत. राजकारणाचे इतके गटार कधीच झाले नव्हते. सत्तेचा अमर्यादित लोभ हेच या नैतिक ऱ्हासाचे मुख्य कारण आहे. नोटाबंदीचा परिणाम या गुंडांवर झालेला नाही. कारण राज्यकर्त्या पक्षात ते आरामात जगतात व त्यांनी केलेल्या गुन्ह्यांतून सुटका व्हावी यासाठी सत्ताधारी पोलीस ठाण्यांवर  दबाव आणतात. पोलिसांवर हल्ला करणारा श्याम शिंदे आज भाजपात सामील झाला आहे. पवन पवार, पिंटू धावडे, विठ्ठल शेलार असे शेकडो गुन्हेगार भाजपात सामील झाले व ते वाल्याचे वाल्मीकी होतील. त्यांच्या मदतीने निवडणुका जिंकू असे सांगणारे भाजपचे नेते व मंत्री महाराष्ट्राचे पाय खेचत आहेत. श्री. मा. गो. वैद्य यांचे या गुंडभरतीवर काय म्हणणे आहे? की उद्या महाराष्ट्राचे चार तुकडे पाडायलाही याच गुंडांची मदत लागेल म्हणून श्री. वैद्यही त्यांचे समर्थन करतील? हे एकदा त्यांच्या मुखातून येऊ द्या.

रशियात काय होते?

‘‘रशियात गुन्हेगारांना सरळ गोळ्या घालतात, इटलीत तुरुंगात टाकतात, तर हिंदुस्थानात ते लोकप्रतिनिधी बनतात,’’ असे एक विधान हिंदुस्थानचे अमेरिकेतील माजी राजदूत अबिद हुसेन यांनी एकदा केले होते. मतदारांवर दबाव टाकण्यासाठी जिंकून येण्याची क्षमता या लोभातून हे सर्व भूत निर्माण झाले. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी हे मान्य केले. त्यांनी गुन्हेगारांना सरळ सांगितले आहे, आम्ही तुम्हाला संरक्षण देतो. तुम्ही आम्हाला विजय मिळवून द्या. असे धोरण राबवले जात आहे. अशाने उद्या अतिरेकी व देशद्रोही पावन केले जातील. राज्य करण्याची ही पद्धत नाही. गुंडांचे असे ‘रिक्रूट’ खुलेपणाने काँग्रेस-राष्ट्रवादीनेही केले नव्हते. पण दीनदयाळ उपाध्याय, हेडगेवार, गोळवलकर गुरुजींच्या नावाने नैतिकतेचे राजकारण करणारे आज जे करीत आहेत ते श्री. मोदी यांना मान्य आहे काय? श्री. अण्णा हजारे यांचा एककलमी कार्यक्रम म्हणजे शरद पवार यांच्यावर सतत आरोप व टीका करणे. महाराष्ट्रातील राजकारणाचे ज्याप्रकारे गुन्हेगारीकरण सुरू आहे त्याकडे त्यांनी सरळ दुर्लक्ष केले. त्यावर या थोर समाजसेवकाने साधा ‘ब्र’देखील काढला नाही. हे अस्वस्थ करणारे आहे. चर्चिलने हिटलरचा पराभव केला आणि जग हुकूमशाहीतून बंधमुक्त केले. त्यांच्या कन्येने पित्याच्या मृत्यूपूर्वी तीन महिने आधी एक पत्र लिहिले. त्यात तिने म्हटले होते-

‘‘प्रत्येक इंग्लिश स्त्री, मुले नव्हे, तर सबंध जगाचे नागरिक तुमचे ऋणी आहेत. कारण त्यांना जे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे ते तुमच्यामुळे. पैशाची उधळपट्टी करून ब्रिटन गरीब झाले नाही. सबंध जगातील माणसाची प्रतिष्ठा आणि त्याचे मानवी अधिकार नष्ट होऊ नयेत यासाठी झालेल्या लढ्यासाठी आपले राष्ट्र गरीब झाले.’’

भारतीय जनता पक्षाचे जे लोक गुंडांचे समर्थन करीत आहेत त्यांनी व याच विचारसरणीच्या इतर पक्षांनी महाराष्ट्राची वाट लावणं थांबवायला हवं. साधनशूचिता व नैतिकता ही कालपर्यंत फक्त भारतीय जनता पक्षाची मक्तेदारी होती. तो बुरखा आता फाटला आहे असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. गुन्हेगार-राजकारणी प्रेमसंबंधांवर व्होरा अहवाल सादर झाला तेव्हा त्यातली काही पाने हरवली असल्याची बोंब भाजपने संसदेत मारली. त्या हरवलेल्या पानांवर स्वतःच्या गुन्हेगारीची माहिती देऊन त्या अहवालास भाजपने पाने जोडली आहेत.

सुखे नाकारण्याची शक्ती शेवटी कोणातच नाही! गुन्हेगार व राजकारण यांनी देश घेरला गेलेला आहे.

[email protected]

 

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या