सत्तेचा दुरुपयोग करणारेच खरे देशद्रोही! सोनिया गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा

देशातील सत्ताधाऱयांकडून धर्म, भाषा, जात आणि लिंग यावरून हिंदुस्थानी नागरिकांत फूट पाडण्यासाठी आपल्या शक्तीचा गैरवापर केला जात आहे. अशा प्रकारे सत्तेचा दुरुपयोग करणारेच खरे देशद्रोही आहेत, अशा शब्दांत कॉँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सोनिया गांधी यांनी एका लेखाच्या माध्यमातून संविधान रक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. सत्तेत असलेल्यांकडूनच स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचा पाया कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनात्मक संस्थाच्या माध्यमातून लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्याऐवजी त्या नष्ट केल्या जात असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे.

देशातील बहुसंख्य नागरिक आर्थिकदृष्टय़ा त्रस्त आहेत,  मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या निवडक मित्रांचे भले करण्याकडे सत्ताधारी जास्त लक्ष देत आहेत. कायद्याचा वापर न्याय देण्याऐवजी लोकांना त्रास देण्यासाठी केला जात असून देशात जाणूनबुजून द्वेषाचे वातावरण निर्माण केले जात आहे. या पद्धतशीरपणे सुरू असलेल्या हल्ल्यापासून संविधानाचे रक्षण करून लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.