जे उपाशी असतील त्यांनी सामना पाहायला जाऊ नये, मंत्र्याच्या विधानामुळे वादंग

हिंदुस्थानी विरूद्ध श्रीलंका एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली असून या मालिकेतील एक सामना केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये होणार आहे. या सामन्यासाठीची तिकीटे खूप महाग असून ती आम्हाला परवडत नसल्याने काही क्रिकेटप्रेमींचे म्हणणे आहे. त्यांचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेण्याऐवजी केरळच्या क्रीडामंत्र्यांनी तिकीटावरील कर कमी करण्याची आवश्यकता नसून, जे उपाशी आहेत त्यांनी सामना पाहायला जाऊ नये असा सल्ला दिला आहे.

व्ही.अब्दुलरहमान हे केरळचे क्रीडामंत्री असून त्यांनी तिकीट दरांवरून केलेल्या या विधानामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे. गरीबांची असा प्रकारे थट्टा उडवणे हे अब्दुल रेहमान यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीला शोभत नाही असे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा गरिबांचा पक्ष आहे असं म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी अब्दुल रेहमान यांना मंत्रीपदावरून तत्काळ दूर करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते व्ही.डी.सतीशन यांनी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष के.सुरेंद्रन यांनी हिंदुस्थान आणि श्रीलंकेदरम्यान होणाऱ्या सामन्याच्या तिकीटावर लावलेला करमणूक कर तत्काळ रद्द करावा अशी मागणी केली आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनीच सामना पाहायला जावे असे म्हणणे हे क्रीडाप्रेमींचा एकप्रकारे अपमानच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केरळ सरकारने या सामन्याच्या तिकीटावरील करमणूक कर हा 5 टक्क्यांवरून 12 टक्के केल्याने तिकीटे महागली आहेत. यामुळे सामना पाहण्यासाठी उत्सुक अनेक क्रिकेटप्रेमी नाराज झाले आहेत असे के.सुरेंद्रन यांनी म्हटले आहे. प्रशासनाने मात्र हे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की तिकीटाचे दर वाढवले नसून ते कमी करून 12 टक्क्यांवर आणले आहेत.