5 फेब्रुवारी चलो मलंगगड, उत्सवाची जोरदार तयारी, गर्दी उसळणार

‘हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट’ असा नारा देत रविवार 5 फेब्रुवारीला कल्याणसह ठाणे जिह्यातील हजारो शिवसैनिक आणि हिंदू भाविक मलंगगडावर धडकणार आहेत. मच्छिंद्रनाथांच्या उत्सवाची शिवसैनिकांसह भक्तांनी जोरदार तयारी केली असून ‘जय मलंग… श्री मलंग’च्या जयघोषाने माघी पौर्णिमेला श्री मलंगगड दुमदुमून जाणार आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने 1982 पासून शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मलंगमुक्तीचे आंदोलन सुरू झाले. ही परंपरा आजही अखंड सुरू आहे. कल्याण शहरापासून 11 किमी अंतरावर अंबरनाथ तालुक्यात श्री मलंगगड आहे. श्री मलंगगड हे स्थान गोरक्ष रांगेतील एक देवस्थान आहे. मलंगगडावरील श्री मच्छिंद्रनाथांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. मच्छिंद्रनाथांनी याच ठिकाणी अमरनाथांना दीक्षा दिल्याची आख्यायिका आहे. माघ पौर्णिमेला मलंगबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी शिवसैनिकांसह 16 हिंदुत्ववादी संघटना आणि असंख्य भाविक येथे येत असतात. या वर्षीही 5 फेब्रुवारीला हजारो भाविक मलंगगडावर धडकणार आहेत.

हिंदू परंपरेनुसारच विधी
मलंगगडावर हिंदू भाविकांचीच वहिवाट आहे. कुणी कितीही हिंदूंचा हक्क डावलण्याचा प्रयत्न केला तरी न्यायालयात हा दावा आम्ही जिंकू, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण शहरप्रमुख सचिन बासरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, उल्हासनगर झोन चारचे डीसीपी डॉ. सुधाकर पाठारे यांनी रविवारी मच्छिंद्रनाथांच्या समाधीस्थळी वार्षिक स्नान, पालखी, गंधलेपन, महाआरती यासाठी 20 भाविकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिल्याचेही बासरे यांनी सांगितले.

शिवसैनिक आणि श्रद्धाळूंनी उत्साहात सहभागी व्हावे! उद्धव ठाकरे यांचे आवाहन

श्रीक्षेत्र मलंगगड हे हिंदूंचे श्रद्धास्थान असून प्रतिवर्षीप्रमाणेच रविवारी मलंगगड यात्रेसाठी शिवसैनिकांनी व श्रद्धाळूंनी मलंगगडावरील उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

मलंगगड मुक्तीचे आंदोलन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले व पुढे ही चळवळ कडवट निष्ठावान शिवसैनिक आनंद दिघे यांनी चालवली. मलंगगडावरील यात्रा म्हणजे समस्त हिंदूंसाठी आकर्षण ठरली. मलंगगडावर अनेक विकासकामे अपूर्ण राहिली असून भविष्यात शिवसेना त्या कामांना गती देईल, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.