शिवसेनेची हेल्पलाइन खणखणतेय, तक्रारींवर तक्रारी…

146

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत १२ लाख मतदारांची नावे निवडणूक यादीतून गायब झाली. या मतदारांच्या तक्रारींसाठी शिवसेनेची १८००२२८९५ ही हेल्पलाइन आजपासून सुरू झाली. मतदान करायला न मिळाल्याचा संतापच या हेल्पलाइनवरून मतदारांनी नोंदवला. सेकंदाचीही उसंत न मिळता सतत खणाणणाऱ्या या हेल्पलाइनवर पहिल्याच दिवशी हजारो मतदारांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या. सर्व मतदारांच्या तक्रारी घेऊन शिवसेना निवडणूक आयोगाला जाब विचारणार असून न्यायालयात दाद मागणार आहे. याबाबतची माहिती मिळताच मुंबई-ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांनी आपल्या तक्रारींसाठी शिवसेनेचा हेल्पलाइन नंबर डायल केला. मुंबई शहर तसेच उपनगरातून मोठय़ा प्रमाणात या हेल्पलाइनवर तक्रारी आल्या असून मतदार यादीतून कुटुंबेच्या कुटुंबेच गायब आहेत. तसेच एकाच चाळीतील अनेक घरांतील नावेच मतदार यादीत नसल्याच्या शेकडो तक्रारी आज नोंदविण्यात आल्या. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या शाखांमध्येही मोठय़ा प्रमाणात तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.

निवडणूक कार्यालयाकडून तक्रारींची दखल नाही

निवडणुकीच्या दोन दिवस आधीच यादीत बदल करून ती प्रसिद्ध करण्यात आली. गोरेगावातील राहणाऱ्या शिवाजी आंब्रे यांचे नावही यादीत नव्हते. आपण ज्या वेळी निवडणूक कार्यालयाकडे तक्रार करण्यासाठी गेलो त्यावेळी त्या विभागातील अनेक मराठी माणसेही आपली तक्रार घेऊन आले होते, मात्र तक्रार घेतली गेली नाही असे आंब्रे म्हणाले. त्याचप्रमाणे भांडुपच्या कांजूरगाव येथील शंकर फडतरे यांनी आपल्या चाळीतील २२ जणांची नावेच मतदार यादीत नसल्याची तक्रार नोंदविली आहे. अशा असंख्य तक्रारींचे फोन रविवारी हेल्पलाइनवर खणखणत होते.

आपली प्रतिक्रिया द्या