धमक्यांची दहशत

39

दीपेश मोरे

[email protected]

बॉलीवूडमधील सेलिब्रिटी असो, राजकीय नेतेमंडळी, क्यावसायिक किंवा अन्य क्षेत्रातील बडी क्यक्ती, सर्वच सध्या धमक्यांच्या दहशतखाली आहेत. मुंबईत अंडरवर्ल्डचा दबदबा असताना धमक्यांचे हे प्रकार वारंवार घडत असत. पण आता जमाना बदललाय. ऊठसूट कुणीही वाटेल तसे कुणालाही धमकावत आहे. धमकावणे, खंडणी मागणे हा गंभीर गुन्हा असल्याचे माहीत असूनही गेल्या काही दिवसात या घटना वाढल्या आहेत. कुणी बदला घेण्यासाठी, कुणी वैयक्तिक वादातून तर कुणी अन्य काही कारणावरून धमकावीत असल्याने पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. रिझर्क्ह बॅंकेचे गक्हर्नर उर्जित पटेल, राज्यातील महिला आमदार, निर्माते दिग्दर्शक महेश भट यांसारख्या अनेकांना मागील काही दिवसात धमकावण्यात आले आहे. कधी कुणाचा मेसेज, ई मेल किंवा फोन येईल याचा नेम नाही. म्हणूनच सर्वच क्षेत्रातील बड्या व्यक्तींमध्ये धमक्यांची प्रचंड दहशत आहे.

बेरोजगार तरुणाची भडास

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना धमकीचा ई मेल आला. बँकेच्या पदावरून पायउतार व्हा, नाहीतर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या जिवाचे बरेवाईट केले जाईल, अशी धमकी या ई मेलमधून देण्यात आली. याबाबत तक्रार आल्यानंतर सायबर पोलिसांनी नागपूरच्या एका सायबर कॅफेमधून विजय बद्दलवार या तरुणाला अटक केली. विजय याने पदवीनंतरचे शिक्षण परदेशात पूर्ण केले. उच्चशिक्षण घेऊनही तो सध्या बेरोजगार होता. त्यातच नोटाबंदीमुळे आलेली मंदी या तणावाखालीच त्याने उर्जित पटेल यांना धमकीचा ई मेल केल्याचे तपासातून उघड झाले. असे जरी असले तरी यामागे नेमके कारण काय आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

मागून मिळत नाही म्हणून धमकावले

उत्तर प्रदेशमधील एका नामचीन गुंडाच्या नावाने एका तरुणाने निर्माते दिग्दर्शक महेश भट यांना धमकावले. ५० लाख दिले नाही तर मुलीला ठार करेन, अशी धमकी या तरुणाने दिली. उत्तर प्रदेश पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱयांनी संदीप साहू या तरुणाला अटक केली. संदीप हा  कर्जबाजारी आहे. त्याला पैशांची आवश्यकता होती. सहज पैसे मिळविण्याचा हाच मार्ग असल्याने त्याने महेश भट यांना टार्गेट केले. संदीपला चित्रपट पाहण्याची प्रचंड हौस होती. अनेक चित्रपटांचा त्याने पहिलाच शो पाहिला. अभिनेते आणि अभिनेत्री या सर्वांचे आपण चाहते आहोत. कर्जबाजारी झालो तरी चित्रपट मात्र बघतोच, त्यामुळे अडचणीत हेच आपल्या मदतीला येतील असे संदीपला वाटले. मात्र मागून कुणी देणार नाही म्हणून त्याने 50 लाखांसाठी भट यांना धमकी दिली.

महिला आमदार टार्गेटवर

महिला आमदारांना विनकारण अश्लील आणि धमक्यांचे मेसेज पाठविणाऱया एका आरटीआय कार्यकर्त्याला विलेपार्ले पोलिसांनी जळगाव येथून पकडले. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यासह सुमारे डझनभर आमदार आणि राजकीय नेत्यांना या आरटीआय कार्यकर्त्याने अशाच प्रकारे मेसेज पाठविल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. मात्र त्याने असे का केले याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. दरम्यान आरटीआयच्या माध्यमातून आपण राजकीय मंडळीच्या विरोधात आवाज उठवीत असल्याने आपल्याला अडकविले जात असल्याचे या आरटीआय कार्यकर्त्याने म्हटले आहे. दरम्यान यानंतर काँग्रेसच्या माजी आमदार वर्षा गायकवाड यांनीदेखील आपल्याला अश्लील मेसेज येत असल्याची तक्रार वडाळा पोलीस ठाण्यात केली आहे.

मेसेज आणि मेलचा वापर

हायटेक जमान्यात धमक्या देण्यासाठी देखील हायटेक माध्यमांचा वापर होताना दिसत आहे. बोगस कागदपत्रांवर सीम कार्ड घ्यायचे आणि त्या नंबरवरून धमकीचा मेसेज पाठवायचा. मेसेजबरोबरच ई मेलवरून धमकी देण्याचे प्रकारही वाढले आहेत. अशा प्रकरणामध्ये इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा वापर केल्यामुळे धमकी, खंडणीच्या कलमांबरोबरच आयटी अॅक्टमधील कलमांतर्गत कारवाई होऊ शकते.

धमक्यांची पत्रे

शिर्डी साई संस्थाचे विश्वस्त सचिन तांबे आणि मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांना खंडणीसाठी पत्रातून धमकी देण्यात आली आहे. २० लाख रुपये द्या नाहीतर बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी पोस्टाने पाठविलेल्या पत्रामध्ये देण्यात आली आहे. खासदार सरदार तारासिंग यांनादेखील एकामागून एक अशी तीन पत्रे पाठविण्यात आली होती. त्यांनाही एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकाविण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या