लोणी मावळ:अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून; तिघांना फाशी

सामना प्रतिनिधी । नगर

पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार व निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपी संतोष लोणकर, मंगेश लोणकर, दत्तात्रय शिंदे या तिघांना आज येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी फाशीची, तसेच विविध कलमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी कामकाज पाहिले.पारनेर तालुक्यातील लोणी मावळा गावात २२ ऑगस्ट २०१४ रोजी शाळकरी मुलगी ही घरी जात असताना तिला रस्त्यावरील चारीच्या पुलाखाली ओढून तिन्ही आरोपींनी आळीपाळीने अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मुलीच्या नाका-तोंडात चिखल कोंबला. श्वसननलिकेत खोलवर चिखल गेल्यामुळे तिचा गुदमरून मृत्यू झाला होता. तसेच आरोपींनी त्या पीडित मुलीच्या अंगावर, डोक्यामध्ये व गुप्तांगावर स्क्रू ड्रायव्हरने जखमाही केल्या होत्या. या घटनेमुळे जिह्यात एकच खळबळ उडाली होती. घटनेचा तपास करण्यासाठी तत्कालीन पोलीस अधिकाऱयांनी तपास करून आरोपींना पकडले.

या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने ३२ साक्षीदार तपासण्यात आले. घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता; परंतू परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे ऍड. निकम यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. या खटल्याची सुनावणी एक सप्टेंबर २०१५ पासून येथील न्यायालयात सुरू होती. घटनेच्या अगोदर आरोपीने पीडितेचा केलेला पाठलाग, काढलेली छेड, घटनेतील वस्तू, पीडितेची मैत्रीण, आरोपीने ज्याच्याजवळ या घटनेची हकीगत सांगितली, तो साक्षीदार, वैद्यकीय अहवाल व त्याबाबतचे पुरावे आरोपींच्या कपडय़ांवरील व घटनास्थळावरील घेण्यात आलेले चिखलाचे नमुने , पोलीस अधिका-यांनी केलेला तपास यांसह साक्षीदारांनी नोंदविलेल्या साक्षी या खटल्यात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरल्या होत्या.

येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर याची सुनावणी सुरू झाल्यानंतर आरोपींकडून उच्च न्यायालयामध्ये विविध प्रकारचे अर्ज दाखल केल्यामुळे खटला चालविण्यामध्ये वेळ गेला होता. दुसरीकडे, वैद्यकीय पुरावा व घेण्यात आलेल्या आरोपींच्या चाचण्या या अतिशय महत्त्वपूर्ण होत्या. पीडित मुलीच्या मैत्रिणीने दिलेली साक्ष व तिने याअगोदर पीडित मुलीला झालेली छेडछाड याबाबतचेसुद्धा म्हणणे न्यायालयासमोर मांडले होते. तपास अधिकाऱयांच्या साक्षीसुद्धा यामध्ये महत्त्वाच्या ठरल्या होत्या. २०१४ पासून हा खटला सुरू होता. आज या प्रकरणामध्ये न्यायालयाने तिन्ही आरोपींना 6 नोव्हेंबर 2017 रोजी दोषी ठरविल्यानंतर आरोपींनी त्या वेळेला आमच्या कुटुंबाचा विचार करावा, असे सांगितले होते. त्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. उज्ज्वल निकम यांनी यावेळी युक्तिवाद करताना लोणी मावळा येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, पीडित मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला. तिचे हात-पाय ओढून तिला ठार मारले. छातीवर, गुप्तांगावर असलेल्या जखमांबाबतचे सर्व पुरावे न्यायालयासमोर सिद्ध झाले आहेत. आरोपींमध्ये विकृती आहे. त्यांनी पीडित मुलीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी वेडसर, भोळसर नाहीत. त्यांना पश्चात्तापसुद्धा झालेला नाही, असे त्यांनी शिक्षेसंदर्भात केलेल्या युक्तिवादात म्हटले होते. पंजाब येथील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात कशा पद्धतीची शिक्षा दिली, याबाबतचे दाखले दिले. प्रत्येक गुन्हेगार नार्को टेस्ट करा, असे म्हणतो; पण न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून आरोपींना मृत्युदंड द्यावा, असा युक्तिवाद त्यांनी केला होता.

आज सकाळी आरोपींना न्यायालयामध्ये आणले होते. त्यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. संतोष लोणकर, मंगेश लोणकर व दत्तात्रय शिंदे यांना भा.दं.वि. ३७६ अ, १२० ‘ब’ या कलमांतर्गत तिहेरी जन्मठेप व भा.दं.वि. ३७६ व ३०२ अन्वये फाशीची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे. दंडातील एक लाख रुपये रक्कम पीडित कुटुंबाला द्यावी; तर ५० हजार रुपये सरकारकडे जमा करावे लागणार आहेत. गुह्यात वापरलेली दुचाकी, वस्तू विकून रक्कम सरकारजमा केल्या जाईल, असा आदेशही देण्यात आला आहे. आरोपींच्या वतीने ऍड. राहुल देशमुख, ऍड. अनिल आरोटे, ऍड. परिमल खुळे यांनी काम पाहिले.

ह सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. उज्ज्वल निकम यांनी याच नगर जिह्यात गाजलेल्या पाथर्डी येथील कोठेवाडी प्रकरणामध्ये युक्तिवाद केला होता. लोणी मावळा प्रकरणामध्येही, तसेच सध्या सुरू असलेल्या ‘कोपर्डी’ खटल्यातसुद्धा ते बाजू मांडत आहेत. राज्यामध्ये घडलेल्या घटनांसंदर्भात आत्तापर्यंत ४० फाशीच्या शिक्षा, ६३५ जन्मठेपेच्या शिक्षा दिल्याचे सांगून, लोणी मावळाचा खटला हा एकप्रकारे आव्हान होते. मात्र, परिस्थितीजन्य पुराव्यांवरून व साक्षीदारांमुळे हा निकाल लागला आहे, असे ऍड. उज्ज्वल निकम म्हणाले.

क्षणाक्षणाला आठवण येते – आई

‘माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱया या नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी होती. ती न्यायालयाने दिल्याने माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल. शुक्रवारी याच दिवशी या नराधमांनी माझ्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला होता. आई संतोषीमातेने त्यांनाही आज शुक्रवारी शिक्षा सुनावली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विशेष सरकारी वकील मिळावेत म्हणून मागणी केली व सरकारनेही तत्काळ याची दखल घेऊन ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली. मला नातेवाईक, ग्रामस्थ, पोलीस प्रशासनाने मोलाची साथ दिली. मला एकटीच मुलगी होती. ती या नराधमांनी हिरावून घेतली. आज क्षणाक्षणाला तिची आठवण येते,’ असे पीडितेच्या आईने यावेळी सांगितले. निकालाने समाधानी असल्याची प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी यावेळी दिली. ‘ऍड. निकम यांची नियुक्ती करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्याच मुलीला नाही, तर राज्यातील मुलींना न्याय दिला आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

गुन्हेगारीला आळा बसेल

‘लोणी मावळा व अत्याचार खून प्रकरणाचा खटला हा माझ्यासमोर एकप्रकारे आव्हानच होते. खटल्यामध्ये प्रत्यक्ष साक्षीदार नसला, तरी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी ठरले. शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱया पाप्यांना धडकी भरविणारा हा निकाल आहे. त्यामुळे अशा घटनांना यापुढे निश्चित आळा बसेल,’ असा विश्वास ऍड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला. ‘या खटल्यात परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदार, पोलिसांची चांगली मदत मिळाली. प्रत्येक तारखेला पोलीस हजर राहून घटनेसंदर्भातील माहिती त्यांनी न्यायालयासमोर मांडली. पोलीस निरीक्षक शरद जांभळे यांनीसुद्धा या खटल्यामध्ये विशेष मेहनत घेतली. त्यामुळे या सर्व खटल्याचे श्रेय पोलिसांच्या टीमला व साक्षीदारांना देतो,’ असे निकम म्हणाले.

ग्रामस्थ पीडित कुटुंबाच्या पाठीशी – शेंडकर

‘घटना घडल्यापासून सर्व ग्रामस्थ पीडित कुटुंबाच्या पाठीशी होते. या निकालाने गावातील मुलीला न्याय मिळाला आहे. यासाठी कष्ट घेणाऱया पोलीस प्रशासन, तसेच ऍड. उज्ज्वल निकम यांच्यासह ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांचे आभार मानतो,’ अशी प्रतिक्रिया लोणी मावळाचे माजी सरपंच विलास शेंडकर यांनी दिली.

निकालाने गुन्हेगारांवर वचक – जांभळे

‘तत्कालीन पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अपर अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाचा तपासात उपयोग झाला. आजच्या निकालाने गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना निश्चितपणे पायबंद बसले,’ असा विश्वास या घटनेचा तपास करणारे पोलीस निरीक्षक शरद जांभळे यांनी व्यक्त केला.

घटनाक्रम –

२२ ऑगस्ट २०१४ रोजी घटना घडली.

पंधरा दिवसांत आरोपींना अटक.

११ नोव्हेंबर २०१४ रोजी दोषारोपपत्र दाखल.

१ सप्टेंबर २०१५ रोजी सुनावणीला सुरुवात.

७ जुलै २०१७ रोजी सुनावणी पूर्ण.

३२ साक्षीदार तपासले. २४ परिस्थितीजन्य पुरावे.

६ नोव्हेंबर २०१७ रोजी आरोपींवर दोषारोप सिद्ध.

११ नोव्हेंबर २०१७ रोजी आरोपींना शिक्षा.

आपली प्रतिक्रिया द्या