पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तीन कुख्यात आरोपींचे पलायन

17

सामना प्रतिनिधी । नागपूर

वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या तीन कुख्यात आरोपींनी हुडकेश्वर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणामुळे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी हुडकेश्‍वर पोलीस ठाण्यातील दोन शिपायांना निलंबित केले आहे. ओमप्रकाश बिश्नोई , कैलास बिश्नोई आणि ओमप्रकाश पांडे असे आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपी राजस्थानमधील रहिवासी आहेत.

हुडकेश्वर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये तिन्ही कुख्यात आरोपींना अटक केली होती. या अनुषंगाने न्यायालयाने त्यांना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे बुधवारी रात्री त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागातून बाहेर निघताच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हे तिन्ही कुख्यात चोरटे पसार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊनही ते अद्याप सापडले नसल्यामुळे हेड कॉन्स्टेबल विकास बालपांडे आणि शिपाई अमित डेकाटे यांना निलंबित करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या