बिबट्याच्या पिल्लांची तस्करी, पुण्यात 3 आरोपी गजाआड

सामना ऑनलाईन । पुणे

पुणे ग्रामीण पोलिसांनी 4 महिन्यांच्या बिबट्याच्या पिल्लांची तस्करी करणाऱ्या 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे-सातारा मार्गावर खेडशिवापूर येथे राजगड पोलिसांनी एका कारमधून दोन जिवंत बिबट्याच्या पिल्लांची सुटका केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या तिघा आरोपींना अटक केली आहेत.

पुण्यातील ग्रामीण भागात मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा संचार दिवसेंदिवस वाढला आहे. तसेच बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. जंगल कमी झाल्यामुळे बिबट्या ऊसाच्या शेतामध्ये पिल्लांना जन्म देत आहेत. काही दिवसांपुर्वी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या अवसरी बुद्रुक येथे ऊसाच्या शेताला लावलेल्या आगीत बिबट्याच्या पाच पिल्लांचा होरपळून मृत्यू झाला होता.