पोलिसांना दाखवला ‘कात्रजचा घाट’; धक्का मारुन ३ आरोपी पळाले 

79
सामना प्रतिनिधी । पुणे

सातारा जिल्ह्यातील खंडाळा न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन गेलेल्या तीन आरोपींनी पोलिसांना कात्रजचा घाट दाखवून पळ काढला. न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर आरोपींना येरवडा कारागृहात परत नेत असताना गाडी लघुशंकेसाठी थांबविण्यात आली. त्यावेळी आरोपींनी पोलिसांना धक्का दिला आणि अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळ काढला. ही घटना सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता घडली.

काल्या उर्फ राजू महादेव पात्रे (रा. विद्यानगर, चिंचवड), संतोष मच्छिंद्र जगताप (रा. मोरवाडी, पिंपरी-चिंचवड), लुभ्या उर्फ संतोष चिंतामणी चांदिलकर (रा. लवळे, मुळशी) अशी पळून गेलेल्यांची नावं आहेत. पळालेल्या आरोपींवर दरोड्याप्रकरणी खटला सुरू आहे. खटल्याची सुनावणी संपल्यावर परत कारागृहात नेत असताना कात्रज जुना घाट चेक पोस्ट पासून काही अंतरावर लघुशंका करण्यासाठी गाडी थांबविण्यात आली. या तिघांना बेड्या न घातला खाली उतरविण्यात आले. त्यावेळी हवालदार चंदनशिवे यांच्यासह चार पोलीस त्यांच्या शेजारी थांबले होते. अंधाराचा फायदा घेत या तिघांनी पोलिसांना धक्के मारून कात्रजच्या जंगलात पळ काढला.

दरोडेखोरांना बेड्या न घालता अंधारात गाडी थांबवून लघुशंकेसाठी उतवण्यात आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपींना पळून जाण्यासाठी अप्रत्यक्ष सहकार्य केल्याचा आरोप पोलिसांवर होत आहे. त्यामुळे आरोपींना परत कारागृहात आणण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या