पवईत पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक

नशेत पोलिसावर दगडफेक करणाऱ्या तिघांना पवई पोलिसांनी अटक केली. राहुल, इस्माईल आणि शैजाद अशी त्या तिघांची नावे असून त्याचे अन्य साथीदार हे फरार आहेत.

सोमवारी रात्री पवई पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत होते तेव्हा मोरारजी नगर येथे रस्त्याच्या कडेला नशा करताना दिसले. पोलिसांनी त्या सर्वांना घरी जाण्यास सांगितले. तेथे रेकॉर्डवरचा आरोपी राहुल, इस्माईल, शैजाद आणि त्याचे काही साथीदार होते. पोलिसांना पाहून राहुल, इस्माईल, शिवकुमार हे दुसऱ्या गल्लीतून पळून गेले. काही वेळाने पोलिसांची गाडी पुन्हा मोरारजी नगर येथे आली असता राहुल आणि इस्माईल हे हातात दगड घेऊन उभे होते. नशेत त्या टोळीने पोलीस वाहनावर दगडफेक केली. सुदैवाने त्या दगडफेकीत कोणी जखमी झाले नाही.

दगडफेकीनंतर पोलीस मोरारजी नगर येथील पोलीस चौकशीला आले. त्यानंतर पोलिसांनी त्या घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्डवरचा आरोपी राहुल आणि त्याचे साथीदार पोलिसांना दिसले.

दगडफेकप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हय़ाची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान मंगळवारी राहुल, इस्माईल आणि शैजादला पवई पोलिसांनी अटक केली. आज त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आणखी तिघांचा शोध सुरू असून त्यांच्या अटकेसाठी खास मोहीम हाती घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या