काँग्रेस अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात; मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात लढत

काँग्रेस अध्यक्षपदासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते  मल्लिकार्जुन खरगे, केरळमधील खासदार शशी थरूर आणि झारखंडमधील नेते के. एन. त्रिपाठी हे तिघेजण रिंगणात आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव अखेरच्या टप्प्यात समोर आले. काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरी लढत खरगे आणि थरूर यांच्यात होणार आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कालच निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे अर्ज दाखल करतील, अशी चर्चा होती. मात्र, आज शेवटच्या क्षणी काँगेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करते वेळी खरगे यांच्याबरोबर काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते उपस्थितीत होते. विशेष म्हणजे जी 23 गटातील नेतेही हजर होते. केरळमधील खासदार शशी थरूर आणि झारखंडमधील काँग्रेस नेते के. एन. त्रिपाठी यांनीही अर्ज दाखल केला. सद्यस्थितीत ही निवडणूक तिरंगी दिसत असली, तरी खरी लढत खरगे आणि थरूर यांच्यात होणार आहे. खरगे यांची बाजू भक्कम मानली जात आहे.

तिघेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत

काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होऊन  19 ऑक्टोबरला  मतमोजणी आणि त्याचदिवशी निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीचे निर्णय अधिकारी म्हणून काँग्रेस पक्षाने मधुसूदन मिस्त्री यांची नेमणूक केली आहे. तिन्ही उमेदवार लोकशाही पद्धतीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. एकही उमेदवार पक्षाने अधिकृत केलेला नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याची माहिती मिस्त्री यांनी दिली.

थरूर संतापले

मल्लाकार्जुन खरगे उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे अनेक नेते उपस्थितीत होते. यावरून शशी थरूर संतप्त झाले. कोणताही उमेदवार पक्षाचा अधिकृत उमेदवार नसेल असे मला सांगण्यात आले होते. मात्र, खरगे यांच्यासोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते मोठय़ा प्रमाणावर अर्ज दाखल करते वेळी गेले होते. माझ्यासोबत सामान्य कार्यकर्ते होते. अनेकांनी मी निवडणूक लढावी याचे स्वागत केल्यामुळे मी अर्ज दाखल केल्याचे थरूर म्हणाले.