मुंबई-हावडा मेलचे तीन डबे इगतपुरीजवळ घसरले

सामना ऑनलाईन । मनमाड

मुंबईहून हावडा येथे जाणाऱ्या १२८०९ डाऊन मुंबई – हावड़ा मेलचे तीन डबे इगतपुरी जवळ रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या मार्गावरुन जाणाऱ्या इतर गाड्यांवर अपघाताचा मोठा परिणाम झाला आहे. एकूण १२ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई-दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानात जाणारी येणारी वाहतूक या अपघातामुळे विस्कळीत झाली आहे. पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत. दरम्यान बचाव कार्यासाठी मनमाड येथून साहित्य व कामगारांना घेऊन विशेष गाडी इगतपुरीकडे रवाना झाली आहे. एकंदरीत अपघाताचा फटका हा या मार्गावरील गाड्यांना बसला असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.