रहाणे, पुजारा,बुमराहवर नजरा,आजपासून तीनदिवसीय सामन्याला सुरुवात

571

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये ट्वेण्टी-20 पाठोपाठ वन डे मालिकाही जिंकण्याचा पराक्रम केला. आता 22 ऑगस्टपासून दोन संघांमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधी शनिवारपासून तीन दिवसीय सराव सामना खेळवला जाईल. यावेळी लक्ष असेल ते अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा या ‘टेस्ट स्पेशालिस्ट’सह विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱया जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवर. या तिघांना कसोटी मालिकेआधी सराव करण्याची अखेरची संधी या सामन्यामुळे मिळणार आहे. हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड इलेव्हन यांच्यामध्ये ही लढत रंगणार आहे.

मयांकसोबत सलामीला कोण येणार…

मयांक अग्रवाल सराव सामन्यात सलामीला येईल हे निश्चित आहे. मात्र त्याच्यासोबत कोणता खेळाडू सलामीला येईल, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. हनुमा विहारी व लोकेश राहुल यांच्यापैकी एकाला ती संधी मिळेल. सराव सामन्यातील कामगिरीवरच कसोटीतील जागाही निश्चित होऊ शकते.

उमेश, इशांतला दाखवायचीय चमक

जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले असल्यामुळे त्याचे सराव सामन्यासह कसोटीतीलही संघातील स्थान पक्के आहे. यावेळी उमेश यादव व इशांत शर्मा हे दोन्ही अनुभवी वेगवान गोलंदाज आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या हिंदुस्थानकडे युवा वेगवान गोलंदाजीचा ताफा असल्यामुळे प्रत्येकाला सर्वोत्तम कामगिरी करावीच लागणार आहे, अन्यथा त्यांचा संघातील पत्ता कट होऊ शकतो. रविचंद्रन अश्विन व रवींद्र जाडेजा फिरकीची धुरा सांभाळतील.

रिषभ, रोहितसाठी महत्त्वाची लढत

रिषभ पंत व रोहित शर्मा या दोघांनाही झटपट मालिकेत म्हणावा तसा ठसा उमटवता आलेला नाही. त्यामुळे कसोटी मालिकेआधी दोघांनाही सराव सामन्यात आपली धमक दाखवावी लागणार आहे. त्यामुळे उद्यापासून सुरू होणारी तीन दिवसीय लढत दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

हिंदुस्थानचा संघ खालीलप्रमाणे विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मयांक अग्रवाल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, रिद्धीमान साहा, इशांत शर्मा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, उमेश यादव.

 

आपली प्रतिक्रिया द्या