
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून लग्न सोहळा आटोपुन परतीच्या प्रवासाला निघालेल्या तिघांना भरधाव वाहनाने चिरडले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात रविवारी पहाटे चारच्या सुमारास मेहकर टोल प्लाझा जवळ घडला आहे. गेल्या 24 तासात समृद्धी महामार्गावर तीन अपघात झाले आहेत.
देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस येथील मांटे परिवाराचा विवाह सोहळा शनिवारी 3 जून रोजी वाशिम येथे संपन्न झाला. विवाह सोहळा आटोपुन वऱ्हाडी मंडळी परत जात असताना काही पाहुणे टाटा नेक्सॉन गाडीने जात होते. समृद्धी महामार्गावर लघुशंकेसाठी मेहकर टोल प्लाझा जवळ तिघेजण गाडी खाली उतरले. तेवढ्यातच मालेगाव कडून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले. यात विजय शेषराव मांटे (48), ओम विजय मांटे (19) आणि तुषार गजानन मांटे (32) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.