नोकरीचे आमिष दाखवून तीन डॉक्टरांनी महिलेस गंडविले!

34

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

मुलास बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेस साडेतीन लाख रुपयांस गंडविणाऱ्या तीन डॉक्टरांसह सहा जणांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महिलेची फसवणूक करणाऱ्या संजय सुतार आणि रुक्मिणी ऊर्फ राणी निलपत्रेवार या दोघांना अटक करण्यात आली. त्या दोघांना दोन एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

तीन डॉक्टरांसह सहा जणांनी संभाजीनगरातील महिलेच्या मुलास बँकेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले. या आमिषाला महिला बळी पडली आणि त्या भामट्यांच्या जाळ्यात अडकली. नोकरी लावण्यासाठी तीन ते सात लाख रुपये द्यावे लागतील म्हटल्यावर त्या महिलेने होकार दिला. त्या भामट्यांनी महिलेकडून ३ ते ७ जुलै २०१६ रोजी साडेतीन लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्या महिलेस मुलाला पंजाब नॅशनल बँकेत नोकरी लावून देत असल्याचे सांगितले. दरम्यान, त्या भामट्यानी मुलास पंजाब नॅशनल बँकेचे नियुक्तीपत्र दिले. नियुक्ती पत्र मिळाल्यामुळे महिलेचा आनंद गगनात मावेना. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर नोकरीवर रुजू होण्यासाठी मुलगा ते नियुक्तीपत्र घेऊन मुंबईला गेला. संबंधित बँकेत गेल्यावर त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांनी बँकेत सध्या कोणत्याही प्रकारची नोकरभरती सुरू नाही आणि हे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे सांगितले. त्या मुलास आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तो घरी परत आला आणि घडलेला सर्व प्रकार त्याने आईला सांगितला.

त्यानंतर महिलेने परभणी येथील डॉ. संजय सत्यभान सुतार, अरुण धाकडे, डॉ. विलास पवार, डॉ. तेजराव हिवराळे आणि दोन महिला अशा सहा जणांच्या टोळक्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी त्या टोळक्याने उडवा उडवीचे उत्तर देत पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. दरम्यान, या महिलेने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तीन डॉक्टरांसह सहा जणांविरोधात फसवणुकीची तक्रार दिली. या तक्रारीवरून त्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या