बालकाचे कुत्र्यांनी लचके तोडले; घाटीत उपचार सुरू

22
फोटो प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । तीर्थपुरी

तीर्थपुरी येथे फडातील ऊस तोडत असताना बाजूला झोपू घातलेल्या १० महिन्यांच्या बालकावर अचानक तीन कुत्र्यांनी हल्ला केला. बालकाला फरफटत ओढून नेण्याचा प्रयत्न कुत्रे करत असताना बालकाच्या पित्याने पाहिले. ते पळतच तिकडे धावल्याने कुत्रे पसार झाले.

बालकाच्या मानेवर, पायाच्या टाच व कमरेवर कुत्र्याचे दात खोलवर घुसल्याने बालक गंभीर जखमी झाल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी घडली. सध्या बालकांवर संभाजीनगरच्या घाटीत २१ नंबरच्या वार्डात उपचार सुरू आहेत. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील सागर सहकारी साखर कारखान्या मार्फत तीर्थपुरी येथे ऊस तोडीला आलेल्या मजुरांची टोळी शेतकरी राजेंद्र चिमणे यांच्या शेतातील ऊस तोडत होते. रामदास राठोड हे आपल्या दहा महिन्यांच्या वैशाली नावाच्या मुलीला फडाच्या बाजूला झोपू घालून नेहमीप्रमाणे पत्नीसह ऊस तोडत असतांना वरील घटना घडली. तिर्थपुरीच्या जायकवाडी परिसरात मांस विक्रीची दुकान असून, त्या मांसामुळे परिसरात शंभराहून अधिक कुत्रे परिसरात भटकत असतात. मांस खाण्यामुळे कुत्रे हिंस्र बनले असून, शेतात जाणाऱ्या-येणाऱ्यांवर अचानक हल्ला करण्याचे प्रकार नेहमी घडत आहेत.

या कुत्र्यांमुळे शेतकरी रात्री शेतात जाण्यास देखील टाळतात. तीन वर्षांपूर्वी याच कुत्र्यांनी एका बारा वर्षीय मुलावर हल्ला करून त्याला खाल्ल्याचा प्रकार घडलेला होता. त्यावेळी या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनीं रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर ग्रामपंचायतने काही कुत्र्यांना पकडून लांब नेऊन सोडले होते. परंतु काही दिवसांनी ते परत आले. दरम्यान, अशा घटना घडू नये म्हणून प्रशासनाने या हिंस्र कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या