
चहापत्ती समजून कीटकनाशक टाकलेली चहा प्यायल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबातील अन्य दोघांसह एका शेजाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरिया, चंदा आणि अक्षय अशी मयतांची नावे आहेत. राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यात रविवारी ही घटना घडली.
कुटुंबातील एका सदस्यांनी सर्वांसाठी चहा बनवला. यासाठी त्यांचा एक शेजारी पण उपस्थित होता. चहा बनवताना चहापत्ती समजून चुकून कीटकनाशक टाकले. यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांसह शेजाऱ्याने चहा प्यायली.
चहा प्यायल्यानंतर सर्वांना फूड पॉईझनिंग झाले आणि उलट्या होऊ लागल्या. सर्वांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सासू दरिया, सून चंदा आणि नातू अक्षय यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सासरा, पती आणि शेजाऱ्यावर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस प्रकरणाचा तपास सुरू आहे.