एकमेकींना वाचवताना तीन मुलींचा नदीत बुडून मृत्यू

सामना प्रतिनिधी । बदनापूर

जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील कस्तुरवाडी गावाकाठच्या नदीवर धुणे धुण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे कस्तुरवाडीवर शोककळा पसरली आहे.

कस्तुरवाडी येथे दमदार पावसामुळे नदीला पाण्याच्या मोठा प्रवाह वाहत आहे. गावातील चार मुली गावाकाठी धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र कपडे धुताताना एका मुलीचा तोल गेल्याने ती नदीत पडली आमि बाडू लागली. तिला वाचवण्यासाठी दुसऱ्या मुलीने पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुली बुडू लागल्या. दोन्ही मुलींना बुडताना पाहून तिसरी मुलगी त्यांच्या मदतीसाठी धावली, मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे तिही पाण्यात पडली. चौथ्या मुलीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र हात सुटल्याने तिघी मुली पाण्यात बुडाल्या. सायमा जुम्मे खाँ पठाण (१४), गजाला शेख मोईन (१७) आणि राणी शेख मोईन (१३) अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत.

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तिन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आली आहेत आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तहसीलदार प्रवीण पांडे यांनी कुटुंबियांची भेट घेत आपत्कालीन निधीतून शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

आपली प्रतिक्रिया द्या