पाकिस्तानात तीन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण

601

पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यांकावर अतोनात हाल होत असतात याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानात तीन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स बजावून निषेध नोंदवला आहे.

14 जानेवारीला पाकिस्तानातील सिंध प्रांतातील उमर गावातल्या शांती मेघवाड व सरमी मेघवाड या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सिंध प्रांतातील जकोबाबाद जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या मेहक नावाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले. अद्याप या मुलींचा शोध लागलेला नाही.

हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत चिंता व्यक्त केली असून पाकिस्तानच्या दूतावासाकडे निषेध व्यक्त केला आहे. हिंदुस्थानने त्या मुलींना शोधून त्यांच्या कुटुंबाकडे द्यावे अशी मागणी देखील केल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या