नायरचे त्रिशतकी फायर

चेन्नई

हिंदुस्थानच्या कसोटी इतिहासात सोमवारचा दिवस अनेक विक्रमांमुळे खर्‍या अर्थाने संस्मरणीय ठरला. करुण नायरच्या त्रिशतकी वादळात इंग्लंडच्या गोलंदाजीचा अक्षरश: पाचोळा झाला. हिंदुस्थानने पाचव्या व अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात ७ बाद ७५९ धावांचा डोंगर उभारून कसोटी कारकीर्दीतील सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम केला. याआधी ९ बाद ७२६ ही हिंदुस्थानची सर्वोच्च धावसंख्या होती.

याचबरोबर आपल्या तिसर्‍याच कसोटीत त्रिशतक ठोकणारा नायर हा पहिला हिंदुस्थानी, तर जगातील तिसरा फलंदाज ठरला. ३८१ चेंडूंत नाबाद ३०३ धावांची खेळी साकारणार्‍या करुण नायरच्या मॅरेथॉन खेळीला ४ टोलेजंग षटकारांसह ३२ सणसणीत चौकारांचा साज होता. नायरने चौकार ठोकून त्रिशतक साजरे केल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने लागलीच डाव घोषित केला.

इंग्लंडच्या ४७७ धावसंख्येचा प्रत्युत्तर देताना हिंदुस्थानने १९०.४ षटकांत ७ बाद ७५९ धावसंख्येवर डाव घोषित करून पहिल्या डावात २८२ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडने चौथ्या दिवसाच्या उर्वरित ५ षटकांच्या खेळात बिनबाद १२ धावा करून सावध सुरुवात केली. पाहुणा संघ अजूनही २७० धावांनी पिछाडीवर आहे. मात्र, चार दिवस खेळून रद्दाड झालेल्या खेळपट्टीवर उद्या हिंदुस्थानी गोलंंदाज डावाने विजय मिळविण्यासाठी टिच्चून मारा करतील, तर इंग्लंडच्या फलंदाजांची कसोटी वाचविण्यासाठी खरी ‘कसोटी’ लागेल. हिंदुस्थानने सोमवारी सकाळी ४ बाद ३९१ धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली.

७१ धावांवर नाबाद परतलेल्या करुण नायरने आज तर नुसता धमाका केला. मुरली विजयला डावसनने २९ धावांवर पायचीत केल्यानंतर रविचंद्रन अश्‍विन (६७) व रवींद्र जाडेजा (५१) यांनी नायरला साथ दिली. सलामीवीर लोकेश राहुलचं द्विशतक अवघ्या एका धावेने हुकल्यामुळे क्रिकेटप्रेमी हळहळले होते. मात्र, करुण नायरने त्रिशतक साजरे करून क्रिकेटवेड्या हिंदुस्थानी चाहत्यांच्या चेहर्‍यावर हसू फुलविले. त्याने पहिल्या शतकासाठी १८५ चेंडू खाल्ले. त्यानंतर दुसर्‍या शंभर धावा १२१, तर तिसर्‍या शंभर धावा केवळ ७५ चेंडूंत पूर्ण करून प्रेक्षकांची चांगलीच करमणूक केली.

संक्षिप्त धावफलक

– इंग्लंड पहिला डाव : ४७७ धावा.

– हिंदुस्थान पहिला डाव : लोकेश राहुल झे. बटलर गो. रशिद १९९, पार्थिव पटेल झे. बटलर गो. मोईन अली ७१, चेतेश्‍वर पुजारा झे. कुक गो. स्टोक्स १६, विराट कोहली झे. जेनिंग्स गो. ब्रॉड १५, करुण नायर नाबाद ३०३, मुरली विजय पायचीत गो. डावसन २९, आर. अश्‍विन झे. बटलर गो. ब्रॉड ६७, रवींद्र जाडेजा झे. बॅल गो. डावसन ५१.
– अवांतर : ७, एकूण : १९०.४ षटकांत ७ बाद ७५९ धावा (घोषित).

– बाद क्रम : १-१५२, २-१८१, ३-२११, ४-३७२, ५-४३५, ६-६१६, ७-७५४.

– गोलंदाजी : स्टुअर्ट ब्रॉड २७-६-८०-२, मोईन अली ४१-१-१९०-१, बेन स्टोक्स २०-२-७६-१, आदिल रशिद २९.४-१-१५३-१, लिअम डावसन ४३-४-१२९-२.

चेन्नईत विक्रमांचं ‘वादळ’

– नायर हा पहिल्या शतकाचे त्रिशतकात रूपांतर करणारा पहिला हिंदुस्थानी, तर जगातील तिसरा फलंदाज.

– याआधी वेस्ट इंडीजचे गॅरी सोबर्स यांनी पाकिस्तानविरुद्ध (३६५), तर बॉब सिम्प्सन यांनी १९६४मध्ये इंग्लंडविरुद्ध (३११) पहिल्या शतकाचे त्रिशतकात रूपांतर केले होते.

– विनोद कांबळी (२२४) व दिलीप वेंगसरकर (नाबाद २००) यांचा पहिल्या शतकाचे द्विशतकात रूपांतर करण्याचा विक्रमही नायरने मोडला.

– त्रिशतक ठोकणारा दुसरा हिदुस्थानी फलंदाज. याआधी वीरेंद्र सेहवागने मार्च २००८मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३१९, तर २००४मध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद ३०३ धावा ठोकल्या होत्या.

– करुण नायरने नाबाद त्रिशतकी खेळी साकारून सचिन तेंडुलकर (नाबाद २४८), व्हीव्हीएस लक्ष्मण (२८१) व राहुल द्रविड (२७०) या महान फलंदाजांची सर्वोत्तम धावसंख्या पिछाडीवर टाकली.

– पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वाधिक धावा फटकाविणारा पहिला हिंदुस्थानी.

– ८४ वर्षांच्या कसोटी इतिहासात हिंदुस्थानने उभारली सर्वाधिक धावसंख्या.

– नायरच्या पहिल्या कसोटीत ४ धावा, दुसर्‍या कसोटीत १३ तर तिसर्‍या कसोटीत नाबाद ३०३ धावा.

– वयाच्या ११व्या वर्षांपासून एकत्र खेळत असलेले कर्नाटकचे लोकेश राहुल (१९९) व करुण नायर (नाबाद ३०३) यांचा चेन्नई कसोटीत धमाका.

– कसोटी मालिकेत ३००हून अधिक धावा अन् २५ बळींहून अधिक बळी टिपणारा रविचंद्रन अश्‍विन पाचवा अष्टपैलू खेळाडू.