प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या; संतप्त जमावाच्या मारहाणीत महिला आणि प्रियकराचा मृत्यू

1179

झारखंडमध्ये गुमला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा आरोप एका महिलेवर करण्यात आला. या घटनेने गावकरी संतप्त झाले. त्यांनी महिला, तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला मारहाण केली. जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. पोलीस घटनेची चौकशी करत असून तिघांना मारहाण करणाऱ्या जमावातील लोकांचा शोध घेण्यात येत आहे.

गुमला जिल्ह्यात डेंगाडीह गावातील मारियानस कुजूरची त्याची पत्नी नीलम कुजूर आणि तिचा प्रियकर सुदीप डुंडुंग यांनी हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. नोन्गामध्ये राहणारा सुदीप मित्र पाकी कुल्लू या मित्रासोबत नीलमला भेटण्यासाठी सोमवारी डेंगाडीह गावात आला होता. गावात आल्यावर त्याने नीलमसोबत तिच्या पतीच्या हत्येचा कट रचला आणि ठरल्याप्रमाणे त्या दोघांनी रात्री मारियानस कुजूरची हत्या केली. या घटनेची माहिती गावात पसरताच गावकरी संतप्त झाले.

काही गावकऱ्यांनी नीलम, सुदीप आणि पाकी या तिघांना बोलण्यात गुंतवले आणि गावात घेऊन आले. एका विवाहित महिलेचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असणे आणि त्यासाठी तिने स्वतःच्या पतीची हत्या करणे गावासाठी अपमानास्पद असल्याचे एका गावकऱ्याने सांगितले. त्याला इतर काही गावकऱ्यांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे गावकरी संतप्त झाले आणि त्यांनी नीलम, सुदीप आणि पाकी या तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाने केलेल्या अमानुष मारहाणीत त्या तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. तिघांना मारहाण करणाऱ्या जमावातील लोकांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या