उपराजधानी नागपूर हादरले, चार तासांत तिघांची निर्घृण हत्या

1942
murder

राज्याची उपराजधानी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचा जिल्हा असणाऱ्या नागपूर शहरात एकापाठोपाठ चार तासांत तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. कायदा, सुव्यवस्थेचे विदारक चित्र पुन्हा समोर आले आहे. बुधवारी रात्री शहराच्या वेगवेगळ्या भागात या खुनाच्या घटना घडल्या. यातील दोन घटनांत नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हातमजुराचा आणि सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कूलर व्यावसायिकाच्या हत्येच्या घटनेचा समावेश आहे. यातील व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी युथ फोर्सचा संस्थापक मिकी बक्षीसह दोन आरोपींना अटक केली आहे.

हत्याकांडाच्या मालिकेतील पहिली घटना नंदनवनमधील केडीके कॉलेज रोडवरील राजेंद्रनगरात घडली. यात 10 रुपयांचा अद्रक खरेदी केल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी भाजी विक्रेता मो. आसिफ शेख मो. सईद (25) याला पैसे देण्यास नकार दिला. आसिफने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी शिवीगाळ करून चाकूने मारून जखमी केले. त्याला वाचविण्यासाठी त्याचा मित्र सय्यद इमरान सय्यद नियाज (२२) धावून आला. त्याच्या मध्यस्थीनंतर आरोपी पळून गेले. पण थोड्यावेळानंतर हे तिघेही आरोपी पुन्हा आले आणि त्यांनी इमरानला पकडून त्याच्या छातीवर चाकूने वार करून त्याला जागीच ठार केले. इतकेच नाहीतर त्याच्या गल्ल्यातील एक हजार रुपये काढून पोबारा केला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंगसाजी नगरात घडली. सेनापतीनगर येथे राहणाऱ्या विक्की विजय डहाके (22) याचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला. विक्की हा हातमजुरी करीत होता. बुधवारी रात्री 11 वाजतानंतर सेनापतीनगरच्या मोकळ्या मैदानात तो मृतावस्थेत आढळला. अज्ञात आरोपींनी त्याच्या पोटावर, पाठीवर, पायावर वार करून त्याला जागीच ठार केले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी सेनापतीनगरात चौकशी करून या हत्येमागील आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी फिर्यादी विजय मारोती डहाके (52, रा. सेनापतीनगर, प्लॉट नं. 29, नागपूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

तिसरी घटना नागपूर शहराच्या अगदी मध्यभागी सदर पोलीस ठाण्यांतर्गत घडली. कूलरचा व्यवसाय करणाऱ्या ऋषी ब्रिज खोसला (57, रा. प्लॉट नं. २८, बैराजी टाउन, छावणी, नागपूर) यांची हल्लेखोरांनी गुरुवारी मध्यरात्री 12.30 वाजताच्या सुमारास सदर हद्दीतील गोंडवाना चौक ते नेल्सन चौक रोडलगत (सदोदय लक्ष्मी अपार्टमेंटच्या वॉल कम्पाउंडजवळ, नागपूर) रस्त्यात अडवून हत्या केली. शॉप बंद करून ऋषी खोसला कारने घरी जात असताना त्यांची धारदार शस्त्राने मानेवर व डोक्यावर वार करून जिवानिशी ठार मारले. फिर्यादी मनीष ब्रिज खोसला (44) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 302 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेत युथ फोर्सचा संस्थापक मिकी बक्षी आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. शहरात एकापाठोपाठ एक घडलेल्या हत्येच्या या घटनांमुळे नागपुरात खळबळ माजली आहे. या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासन हल्लेखोरांना पकडण्यासाठी रवाना झाले असले तरी यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. शहरात पोलिसांचे राज्य आहे, की गुंडांचे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ‘क्राइम कंट्रोल’साठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असतानाच प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांनी उपराजधानी थरारली. खुनाचा प्रयत्न व दुखापतीच्या वाढत्या घटनांनी नागपूरकरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या