शिवसेनेची वचनपूर्ती, तीन उद्यानांचं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

69

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईकरांना मोकळा श्वास मिळावा म्हणून मुंबईतील मोकळी मैदाने शिवसेना त्यांना खुली करून देत आहे. मुंबईतील तीन उद्यानांचे मंगळवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

लहानग्यांसाठी खेळाच्या विविध वस्तूंसह तरुणांसाठी जॉगिंग ट्रॅक, ऍक्युप्रेशर पद्धतीच्या पायवाटा, भरपूर झाडे, आजीआजोबांसाठी बसण्याच्या जागा अशा सोयीसुविधांनी युक्त अशी ही उद्याने मुंबईकरांसाठी खुली करून देण्यात आली आहेत. अशा प्रकारे मुंबईकरांसाठी मोकळी मैदाने उपलब्ध करून शिवसेनेने आणखी एक वचनपूर्ती केली आहे.

प्रभादेवीमध्ये नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या पुढाकाराने शहीद कर्नल संतोष महाडिक मनोरंजन उद्यानाचे, वरळीत उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्या पुढाकाराने माजी महापौर बाबासाहेब वरळीकर मनोरंजन उद्यानाचे तर परळमध्ये नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या पुढाकाराने शहीद विलास विठोबा शिंदे मनोरंजन उद्यानाचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या मुंबई हिरवीगार करण्यासाठी शिवसेना झटत आहे. मुंबईतील अनेक भूखंड गायब होत आहेत; पण आमचे लोकप्रतिनिधी भूखंड लाटत नाहीत तर वाटतात, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला.

प्रभादेवीतील उद्यानाच्या लोकार्पण कार्यक्रमात शहीद कर्नल संतोष महाडिक यांचा जीवनप्रवास, त्यांचे गाव आणि शहीद झाल्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेले अंत्यसंस्कार याबद्दल ‘मी कर्नल संतोष महाडिक बोलतोय’ ही व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आली. सीमेवरील जवान हिंदुस्थानचे रक्षण करत आहेत. त्यामुळे आपण निर्धास्त आहोत. मुंबईत सुरक्षा असो किंवा कुठल्याही सुविधा, शिवसैनिक आणि मुंबईकर सदैव तत्पर राहातील, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी व्यासपीठावर आमदार सदा सरवणकर, नगरसेविका श्रद्धा जाधव, ऊर्मिला पांचाळ, शाखाप्रमुख शैलेश माळी आणि अजित कदम आदी उपस्थित होते.

कर्नल संतोष महाडिकला कश्मीर बदलायचा होता!
कर्नल संतोष महाडिकला कश्मीर बदलायचा होता. दहशतवादी बनून आयुष्य भरकटलेल्यांमध्ये हिंदुस्थानप्रती प्रेम आणि आस्था निर्माण करण्याचे स्वप्न महाडिक संतोषने पाहिले होते. तसे कामही त्याने सुरू केले होते. त्यामुळेच अनेक दहशतवादी शरणही आले होते. परंतु हे काम अर्ध्यावरच सोडून संतोष आपल्यातून निघून गेला, अशा भावना कर्नल संतोष महाडिकचे बंधू जयवंत महाडिक यांनी व्यक्त केल्या.

शहीद विलास विठोबा शिंदे मनोरंजन उद्यान

परळ येथील उद्यानाच्या लोकार्पणप्रसंगी व्यासपीठावर विभाग संघटक अनुपमा परब आणि शहीद विलास विठोबा शिंदे यांची पत्नी आणि आईवडील उपस्थित होते. दरम्यान, २०१९मध्ये शिवसेनेचेच खासदार, आमदार निवडून आणण्याचे वचन आमदार सुनील शिंदे आणि खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी दिले. त्यासाठी चांदीचा एक कलश आदित्य ठाकरे यांना भेट देण्यात आला.

माजी महापौर बाबासाहेब वरळीकर मनोरंजन उद्यान
वरळीतील उद्यानाच्या लोकार्पणप्रसंगी खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, सुनील शिदे, विभागप्रमुख नगरसेवक आशीष चेंबूरकर, नगरसेविका किशोरी पडणेकर, शिवसेना प्रवक्ते अरविंद भोसले, उपविभागप्रमुख राम साळगावकर, हरीश वरळीकर, उपविभाग संघटक ज्योती दळवी, शाखाप्रमुख शेखर कीर, शाखा अधिकारी प्रथमेश गावडे आदी उपस्थित होते. वरळीकरांसाठी साकारलेले हे उद्यान म्हणजे शिवसेनेची वचनपूर्ती असल्याचे मत हेमांगी वरळीकर यांनी व्यक्त केले.

मनसे, राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत
परळ येथील उद्यानाच्या लोकार्पणप्रसंगी मनसे उपाध्यक्ष सागर गावडे, संतोष मुरकर आणि त्यांचे सर्व सहकारी, भाजपाचे वरळी उपाध्यक्ष मिलिंद नाजगरकर, राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते असे मिळून जवळपास 100 ते 200 जणांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

आपली प्रतिक्रिया द्या