बँकेला महागात पडला लोन पे फोन

सामना ऑनलाईन, ठाणे

महागडय़ा फोनसाठी लोन देण्याची स्कीम एका बँकेला चांगलीच महागात पडली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बँकेला कर्जावर फोन घेण्यासाठी तीन भामटय़ांनी बनावट कागदपत्रे सादर करून लाखो रुपयांचा चुना लावला आहे. हे तिघे आरोपी विरार येथील राहणारे आहेत.

मुंबईतील सिटी बँकेचे फ्रॉड ऍण्ड रिस्क मॅनेजमेंट ऑफिसर सचिन जगताप यांनी वर्तकनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार  विकियाना मॉलमधील ऍपल स्टोअरमध्ये बँकेचे काऊंटर आहे. येथे महागडे ऍपल मोबाईल फोन सिटी बँकेमार्फत कर्जाऊ दिले जातात. त्यानुसार श्रीकांत वाघ, मोहीत शर्मा आणि केतन पावशे  या भामटय़ांनी  अनुक्रमे नामदेव पानमंद, विश्वनाथ टक्के आणि राजेश नाई यांच्या आधारकार्डकरील छायाचित्रे बदलून तसेच बनावट बँक खाती उघडून त्याद्वारे तीन महागडे मोबाईल फोन बुक केले होते. हा प्रकार 16 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत घडला.

मोबाईल खरेदी केल्यापासून तिघांनीही कर्जाचे हप्ते भरले नक्हते. कर्जाची ही रक्कम 3 लाख 53 हजार 81 इतकी थकल्याने बँकेने कागदपत्रांची छाननी केली. त्यावेळी हा झोल लक्षात आला.