
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यामध्ये 3 मुले बेपत्ता झाल्याने घबराट पसरली होती. ही मुलं कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक परिसरात पोहायला गेली होती. ज्यानंतर ती घरी परतलीच नव्हती. ही मुले बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.
पोलिसांना आणि स्थानिकांना ही तीनही मुले बुडून मृत्यूमुखी पडली असावीत असा संशय होता. पोलिसांनी ही मुले जिथे पोहायला गेली होती तिथे शोध घ्यायला सुरुवात केली होती. घटनास्थळावर पोलिसांना मुलांचे कपडे व इतर साहित्य सापडले होते.
बुधवारी संध्याकाळपर्यंत ही शोधमोहीम सुरू होती.मात्र नंतर अंधार झाल्याने बचाव पथकाने ही शोधमोहीम थांबवली होतीआज पहाटे पासून ही शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली होती. शोधमोहिमेतील सदस्यांना पारस गौरदीपे, अर्जुन सिंग, दर्शन बच्चाशंकर या जिवलग मित्रांचे आज सकाळी मृतदेह सापडले.
कोरपना तालुक्यात येणाऱ्या अल्ट्राटेक कंपनी वसाहतीतील शाळेत शिकणारी ही तीनही मुले सायंकाळपर्यंत घरी परतली नव्हती. त्यांची शोधाशोध सुरू केली असता गुरूवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास अल्ट्राटेक कंपनीने तयार केलेल्या डबक्याजवळ मुलांचे कपडे आढळून आले होते.
ही मुलं डबक्यात पोहण्यासाठी उतरली होती आणि पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी या मुलांच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर हे तिघेही घरी न जाता थेट या डबक्यात पोहायला आले होते.