गणेशोत्सवापूर्वी खड्ड्यांचे विघ्न दूर होणार; कल्याण-डोंबिवलीतील तीन हजार खड्डे बुजवले

445

जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दैना झाली. पालिका कार्यक्षेत्रातील 190 किलोमीटरपैकी 90 कि.मी.चे रस्ते उखडले आहेत. या रस्त्यांवर साडेचार हजार खड्डे पडले असून पालिकेने आतापर्यंत तीन हजार खड्डे बुजवले आहेत. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डय़ांचे विघ्न दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.

जुलै आणि ऑगस्टच्याच पहिल्या आठवड्यातत झालेल्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवलीसह 27 गावांतील रस्त्यांची दुर्दशा झाली. यामुळे अपघातही वाढले. गणेशोत्सव तोंडावर आल्याने पालिका, एमएसआरडीसी आणि एमएमआरडीए या तिन्ही प्राधिकरणांनी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती हाती घेतली आहे. रस्ते दुरुस्ती कामांचा दैनंदिन आढावा आयुक्त गोविंद बोडके स्वत: घेत आहेत. पालिका कार्यक्षेत्रातील 190 कि.मी. रस्त्यापैकी महत्त्वाचे 90 कि.मी.चे रस्ते उखडले आहेत. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी राज्य शासनाने 327 कोटी रुपये निधी द्यावा, अशी मागणी पालिका प्रशासनाने केली आहे. अद्याप निधी मिळाला नसला तरी पालिकेने रस्ते दुरुस्तीची कामे मात्र सुरू केली आहेत.

नऊ हजार मीटर रस्ते दुरुस्त

महापालिका क्षेत्रांतील अ, ब, क, ड, इ, ह, फ, आय, जे अशा नऊ प्रभागांत गेल्या 10 दिवसांत नऊ हजार मीटर लांबीच्या रस्त्यावरील तीन हजार खड्डे भरण्यात आले. अद्याप दीड हजार खड्डे भरणे शिल्लक आहे. पावसात काम थांबू नये यासाठी खड्डे भरण्यासाठी अस्फाल्ट सिमेंट आणि कोरडे रेडी मिक्स तंत्राचा वापर करण्यात आला.

एकाच वेळी पाच टप्प्यांवर कामे

‘ऍक्शन प्लॅन’नुसार डांबरी रस्ते, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, मुख्य मार्गावरील रस्ते, अंतर्गत रस्ते आणि 27 गावांतील रस्ते असे टप्पे करून एकाच वेळी कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी प्रभाग क्षेत्रनिहाय बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या टीम तयार करण्यात आल्या. कामावर प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी देखरेख ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली, यामुळे कामे जलदगतीने होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या