अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर पकडले

36

सामना ऑनलाईन । आळेफाटा

आळेफाटा येथील मध्यवर्ती चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जुन्नरचे तहसीलदार अनिल काकडे यांनी मध्यरात्री कारवाई करीत पकडले; तसेच ५ लाख ४८ हजार ७०० रुपयाचा दंड ठोठावल्याने वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली असून, त्यांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जुन्नर तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील आणि पारनेर, संगमनेर तालुक्यांतून खुलेपणाने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत होती. ही सर्व वाहतूक आळेफाटा मध्यवर्ती चौकातून होत असल्याने अनेकजण महसूल आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत होते. प्रांताधिकारी देशमुख आणि जुन्नरचे तहसीलदार अनिल काकडे यांना स्थानिक नागरिकांकडून याची माहितीही देण्यात आली होती. मात्र, वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांना अगोदरच कारवाईची टीप मिळत असल्याने कारवाई म्हणावी अशी होत नव्हती. अखेर जुन्नरचे तहसीलदार काकडे यांनी काल रात्री पहाटेच्या दरम्यान काही मोजक्या कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने आळेफाटा मध्यवर्ती चौकातच अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले. स्थानिक पोलीस ठाण्यात जमा केले. अचानक झालेल्या कारवाईमुळे स्थानिक पोलीस यंत्रणेमधील काही कर्मचाऱ्यांची मात्र बोबडी वळली.

आपली प्रतिक्रिया द्या