आंतर रुग्णालय टी-20 स्पर्धेचा थरार

आयडियल स्पोर्टस् अॅकॅडमीतर्फे 9 ते 22 नोव्हेंबरदरम्यान आंतर हॉस्पिटल टी-20 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदान येथील माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर ही स्पर्धा बाद पद्धतीने होईल. यावेळी आयडियल जीवनगौरव पुरस्कार विजेते क्रीडा संघटक व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते तसेच टाटा रुग्णालयाचे क्रिकेटपटू डॉ. शैलेश श्रीखंडे, केईएम रुग्णालयाचे क्रिकेटपटू डॉ.आदिल छागला, लीलावती रुग्णालयाचे क्रिकेटपटू मनोहर पाटेकर आणि जे. जे. रुग्णालयाचे क्रिकेटपटू प्रमोद पाताडे यांचा विशेष गौरव होणार आहे.

या स्पर्धेमध्ये पहिल्या चार विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. सर्वोत्तम क्रिकेटपटू, उत्कृष्ट दोन फलंदाज, उत्कृष्ट दोन गोलंदाज तसेच प्रत्येक संघातील उत्कृष्ट खेळाडूस विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. संयोजक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर स्पर्धेचा ड्रॉ 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वा. जाहीर करण्यात येईल. स्पर्धेला आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे, शिवराम अय्यर, सचिन फाळके व डॉ. स्वप्नील निसाल यांचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णालय क्रिकेट संघांनी प्रवेश अर्जासाठी संघटन समितीचे सहसचिव चंद्रकांत करंगुटकर अथवा प्रदीप क्षीरसागर (7977471943) यांच्याकडे संपर्क साधावा.