घसा दुखतोय…? काय करावे यावर!

>> डॉ. पुष्कर शिकारखाने, कंसल्टिंग फिजिशियन

घसा दुखणे, खवखवणे… थोडक्यात घशाचा संसर्ग… म्हणजेच बोलीभाषेत
थ्रोट इन्फेक्शन… काय करावे यावर!

सर्दी, खोकला, घसा बसणे, घसा खवखवणे या सर्व विकारांचे हे दिवस. घसा दुखायला सर्दीच व्हायला हवी असे नाही, तर वातावरणातील हवाबदल, जंतुसंसर्ग एवढ्य़ाही गोष्टी पुरतात. हा घशाचा संसर्ग मग कितीही पुढे जाऊ शकतो. घसा बसणे म्हणजेच आवाज बदलणे? किंवा आवाजाचा पोत बदलणे. हे सर्वात जास्त प्रमाणात दिसून येतं ते घशाच्या इन्फेक्शनमुळे. हा विकार होण्याचं प्रमुख कारण म्हणजे हवेतील व्हायरल इन्फेक्शन. सध्या आपल्याकडे फ्लूची साथ मोठ्य़ा प्रमाणावर सुरू आहे. अशा प्रकारचे फ्लूच्या वर्गातील किंवा श्वसनाच्या मार्गाला इन्फेक्शन करणारे जंतूंमुळे स्वरतंतूंना सूज येते. त्यामुळे मग आवाज बसतो.

या आजारात आवाजाला विश्रांती देणे आणि घसा ओला राहण्यासाठी पाण्याचे सेवन करणे गरजेचे असते. दुखणं कमी करायला पॅरासिटेमॉलसारखे औषध घेणे, तसेच मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्या पाहिजेत. आवाज बसण्यासाठी इतर कारणे म्हणजे आवाजाचा गैरवापर करणं किंवा मर्यादेच्या पलीकडे आवाज ताणून बोलणं. मोठ्य़ा आवाजात बोलण्याचा प्रयत्न केला तर स्वरतंतूंवर ताण येऊन घसा बसतो. संगीत शिकत असाल तर योग्य प्रशिक्षकाकडूनच ते शिकले पाहिजे. तरीही आवाज बसलाच असेल तर कान-नाक-घशाच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी आणि त्यावर उपचार करावा.

हे उपाय करून पहा
– आवाजाला विश्रांती (व्हॉइस रेस्ट) खूपच महत्त्वाची असते.
– भरपूर पाणी पिणं हा उपाय घसा बसल्यावरही फायद्याचा.
– व्यवस्थित प्रमाणात झोप घेणेही आवश्यक असते.
– सिगारेट किंवा मद्यपान ताबडतोब सोडून द्यायला हवं.
– ऑसिडिटीचा त्रास असलेल्यांनी दारू तत्काळ सोडायला हवी.
– कॅफिनयुक्त पेये आणि तेलकट, तुपकट पदार्थ टाळावेत.
– दूध, हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण प्यायल्यास घसा दुखायचा थांबतो. लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते.
– घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि चिमूटभर कात (विड्य़ात घालतात तो) जिभेवर ठेवून चघळावा.
– वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे. बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे यावर आराम मिळतो.
– तुळशीचा काढा किंवा हर्बल टी प्यावा.
– आवाजाचा गैरवापर करणे टाळायला पाहिजे. आपल्या आवाजाचा व्हॉल्यूम वाढवण्याची गरज असते तेव्हा मायक्रोफोनचा वापर करावा म्हणजे आवाजावर वाईट परिणाम होत नाही. संगीतातील लोकांनीही आवाजाचा योग्य वापर करावा.

ऑसिडिटीमुळेही घसा बसू शकतो
घसा बसण्याचा आजार बरा व्हायला काही वेळ लागू शकतो. त्यामुळे संयम बाळगणं खूप महत्त्वाचं असतं. डॉक्टरांनी सांगितलेले आवाजाचे व्यायाम नीट करावे लागतात. त्यामुळेही घसा लवकर बरा होऊ शकतो. पोटातून आम्लपित्त वर येणं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ऑसिडिटीमुळेही घसा बसू शकतो. छातीत जळजळ किंवा घशात खवखवणं अशी सामान्य लक्षणं दिसतात. यातही आम्लपित्ताचा परिणाम स्वरतंतूंवर होऊन आवाज बसू शकतो. हे निदान करण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. ऑसिडिटी मोठ्य़ा प्रमाणावर असलेली डॉक्टरांच्या लक्षात आली तर त्यावर उपाय करून ते घसा बरा करू शकतात. बराच काळपर्यंत एखाद्याचा आवाज घोगरा असेल आणि त्यावरील सर्व उपाय करून तो बरा होत नसेल तर घशाचा कॅन्सर असू शकतो. कॅन्सरच्या या प्रकारात स्वरतंतूंना झालेला कॅन्सर असू शकतो. त्यामुळे नाक-कान-घशाच्या डॉक्टरांकडे जाऊन निदान करून, प्रसंगी बायोप्सीही करून त्याचे निदान करावे लागते.

आवाज बसण्याची कारणे…
पोटातून आम्लपित्त वर येणं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काही प्रकारच्या ऍलर्जीज असतात. हवाबदलामुळे किंवा परागकणांची, धुरांची, वासांची ऍलर्जी असते. त्यामुळेही आवाज बसू शकतो. कधीतरी अमोनिया किंवा क्लोरिनसारखा एखादा तीक्र वायू नाकाद्वारे घशात गेला तरीही घसा बसतो. सिगारेट पिणाऱयांना किंवा हुक्का पिणाऱयांच्या स्वरतंतूंवर परिणाम होऊन घसा बसण्याचा आजार होऊ शकतो. थायरॉइडचा आजार असलेल्यांनीही घसा बसण्यावर जास्त लक्ष दिले पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या