हर्बल कंपनीचे साडेनऊ लाख लुटणारे माजी कर्मचारी गजाआड

34

सामना ऑनलाईन । मुंबई

पवई येथील एका हर्बल कंपनीच्या कार्यालयात घुसून ९.५० लाखांची रोकड चोरून पसार झालेल्या दोघांना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दिल्लीत जाऊन पकडले. रेहमत मोहमद आली (२१) आणि शिवकुमार प्रताप सिंग अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ६.३५ लाखांची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पवई येथील भवानी इंडस्ट्रीअल इस्टेटमध्ये हर्बल कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीचे मॅनेजर सुमित राठोड (२२) हे आठवडाभर त्यांच्याकडे जमा होणारी रक्कम रविवारी वांद्रे येथील कार्यालयात जमा करतात. रविवार, १८ फेब्रुवारी रोजीसुद्धा ते त्यांच्याकडे जमा झालेली ९.५० लाख रुपयांची रक्कम बॅगेत भरून जमा करण्यासाठी निघाले होते. ते बाहेर निघत असतानाच तोंडावर बुरखा घातलेल्या दोन अज्ञात इसम त्यांच्या कार्यालयात घुसले. त्या दोघांनी राठोड यांच्या तोंडाला पट्टय़ा मारून हातपाय बांधून ठेवले व त्यांच्याकडील रोकड घेऊन तेथून पोबारा केला होता.

याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱयाचे फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला. सोबतच मिळालेल्या टेक्निकल माहितीच्या आधारे पहिजे आरोपी दिल्लीत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक महामुनी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक देसाई यांच्या पथकाने दिल्लीला जाऊन आरोपींना पकडले व साडेसहा लाखांची रोकड हस्तगत केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.

विमानाने आले ट्रेनने गेले
दोघे आरोपी यापूर्वी हर्बल कंपनीत कामाला होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी नोकरी सोडली होती. त्यामुळे त्यांना कंपनीत चालणाऱया व्यवहारांची माहिती होती. मूळचे दिल्ली असणारे आरोपी काम सोडून तिकडे गेले होते. चोरीचा कट रचल्यानंतर त्यांनी विमानाने मुंबई गाठली. ठरल्याप्रमाणे गुन्हा केला आणि ट्रेनने दिल्लीला पोबारा केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या