नागपूरात वाघाची हाडे आणि नखे मिळाल्याने खळबळ

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपूरात वाघाडी हाडे आणि नखे मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रामटेक तालुक्यातील खुर्सापार येथे वनविभागाने टाकलेल्या घाडीत दोन मासेमाऱ्यांकडून वाघाची हाडे आणि नखे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी देवीदास कुमरे आणि बाबुलाल कुमरे या दोघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने दोघांनाही चार दिवसांची कोठडी ठोठावली आहे. खुर्सापूर जवळ असणाऱ्या पेंचच्या घनदाट जंगलामध्ये वाघांची शिकार झाल्याचा संशय वनविभागाने व्यक्त केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका स्वयंसेवी संस्थेमार्फत खुर्सापार येथे वाघांच्या अवयवांची तस्करी होणार असल्याची खबर वनविभागाला मिळाली. खबरीची शहानिशा केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून वाघाची हाडे व नखांसह दोघांना रंगेहाथ अटक केली. दहा हजार रूपयांत हाडे व नखे दिल्याचा सौदा पक्का झाला होता अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात विभागला गेला आहे. जंगलातील जलाशयात अनेकदा अवैध मासेमारी होते. वनविभागाकडून मासेमारांवर कारवाई केली जाते. वनविभागाच्या कारवाईनंतर मासेमाऱ्यांनी जंगलाला आगी लावल्याच्या घटना घडल्या होत्या. या मासेमाऱ्यांच्या मदतीने वाघांची शिकार करण्यात येत असल्याचा संशय वनविभागाला होता. त्यानुसार मंगळवारी वनविभागांने धाड टाकून वाघांचे अवयव जप्त केले.