वाघांची चव बदलली, सांबर-हरणांऐवजी हत्तींवर ताव

सामना ऑनलाईन |  नवी दिल्ली 

वाघाची डरकाळी ऐकून भलभल्यांची भंबेरी उडते. मात्र आता हे वाघ देखील आळशी होत चालेले असून शिकारीसाठी हरिण, सांबर, काळविट, ससे असे प्राणी शोधण्यापेक्षा ते हत्तींच्या पिल्लांची शिकार करण्यातच धन्यता मानत आहेत. जीम कॉर्बेट या राष्ट्रीय उद्यानात वाघांकडून हत्तीच्या पिल्लांची शिकार होण्याचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून वन्यजीव तज्ज्ञांनी याप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे.

उत्त्तराखंड येथील जीम कॉर्बेट या राष्ट्रीय उद्यानात वाघांकडून हत्तीच्या पिल्लांची शिकार होत असल्याचे निर्दशनास आले आहे. अभ्यासकांच्या मते वाघ केवळ हत्तीच्या पिल्लांची शिकारच करतात असे नाही तर काही वेळेस त्यांना खातात सुद्धा. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार वाघ हे हत्तींना कधी खात नसायचे. परंतु सध्याची स्थिती गंभीर आहे. ज्यामध्ये वाघांकडून हत्तींच्या पिल्लांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे.

2014 ते 31 मे 2019 दरम्यान नऊ वाघ,  21 हत्ती आणि सहा बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. 36 प्रकरणांमधील तीन प्रजातींपैकी हत्तींची संख्या ही सर्वाधिक म्हणजे 21 इतकी आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे या हत्तींपैकी 60 टक्के हत्त्तींची पिल्ले आहेत.  वाघांनी हत्तीला खाणे नवलच आहे, असे हिंदुस्थानच्या वन विभागाचे जेष्ठ अधिकारी व राष्ट्रीय उद्यानाचे प्रभारी यांनी सांगितले आहे.

सांबार, हरिण व चितळाच्या तुलनेत हत्तींना मारायला कमी कष्ट व ताकद लागते हे हत्तींच्या शिकारीचे मुख्य कारण असू शकते. शिवाय हत्तींना मारल्यावर त्यांना भरपूर प्रमाणात अन्न उपलब्ध होते, असे राष्ट्रीय उद्यानाचे संचालक चर्तुवेदी यांनी सांगितले. दरम्यान, ही बाब गंभीर असून वनविभागाने याकडे वेळीच लक्ष देऊन योग्य ती पाऊले उचलणे आवश्यक आहे, अन्यथा हत्तींच्या संख्येत आणखी घट होण्याची भिती वन्यजीवप्रेमी कार्यकर्ते अजय डुबे यांनी व्यक्त केली आहे.