पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघिणीचा मृत्यू

22

सामना ऑनलाईन । नागपूर

नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात पूर्व पेंच गाभा वनक्षेत्रातील तुयापार कक्षात वाघिणीचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. शुक्रवारी वीज प्रवाहामुळे वाघिणीसह दोन सांबराच्या मृत्यूनंतर २४ तासातच दुसऱ्या वाघिणीचा मृत्यु झाल्याच्या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली आहे.

खापा वन परिक्षेत्रात बुधवारी दोन बिबट्यांचा मृत्युच्या घटनेनंतर दुसरी घटना शुक्रवारी या वनपरीक्षेत्रातील बडेगाव येथील शेतात विजप्रवाहाने वाघिण आणि दोन सांबराच्या शिकारीची घटना उघडीस आली. त्या वाघिणींचे शवविच्छेदन सुरु असतानाच शनिवारी दुसरी वाघिण मृत पावल्याची माहिती पुढे आली. ही घटना पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील तुयापार कक्षात येते.

पेंच गाभा आणि पेंच बफर क्षेत्रामध्ये वन कर्मचारी पायदळगस्त घालत होते. दरम्यान, येथील अग्नीरेषेवर अंदाजे १२ वय असलेली वाघिण मृतावस्थेत आढळली. ती माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वन परीक्षेत्र अधिकारी आणि सहाय्यक वनसंरक्षकासह इतरही अधिकारी घटनास्थळी पोहचले. वाघिणीचे संपूर्ण शरीर सुस्थितीत आहे. मृत वाघिणीसह परिसराची पाहणी वनाधिकाऱ्यांनी केली. वाघिणीचे वय अंदाजे १२ वर्ष असून ते वृद्धत्वामुळे मरण पावली असावी असा अंदाज आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान सकाळशी बोलताना म्हणाले, वाघिणीचा मृत्यू वृद्धत्वामुळे झाला असावा असा प्रथमदर्शनी वाटते. मात्र, नेमका मृत्यु कशाने झाला याची माहिती मिळावी यासाठी वाघिणीची विष्ठा, व्हिसेरा आणि शरिरातील काही अवयव डीएनए चाचणी आणि न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळेत पाठविण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. चंद्रपूर येथे काही वर्षापूर्वी एक वाघिणीचा मृत्यु झाला होता. मात्र, तो मृत्यू कशाने झाले हे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे वाघिणीच्या शरिरातील काही अवयवाची डिएनए चाचणी केली. तेव्हा साळींदर खाल्यामुळे त्या वाघिणीचा मृत्यु झाल्याचे उघड झाले होते. या सर्वच शक्‍यता पडताळून घेण्यासाठी या सुचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या