टिकटॉकवर बंदीची मागणी, याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार

203

केवळ तरुणच नव्हे तर प्रौढांनाही मोबाईलवर तासन्तास खिळवून ठेवणाऱ्या टिकटॉक या मोबाईल ऍपमुळे मुलांवर वाईट परिणाम होत असून याद्वारे अश्लील व्हिडीओही व्हायरल होत आहेत. एवढेच काय तर तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाणदेखील वाढत आहे. म्हणूनच टिकटॉकवर बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास आज न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने नियमित तारखेनुसार सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले.

हीना दरवेश असे याचिका दाखल करणाऱ्या महिलेचे नाव असून त्यांनी ऍड. अली काशिफ खान यांच्यामार्फत हायकोर्टात त्यांनी याचिका केली आहे. टिकटॉकमुळे अनेकदा जातिवाचक मुद्दय़ांवर व्हिडीओ प्रसारित करण्यात आले असून यामुळे देशात जातीय दंगे होऊ शकतात. तसेच चीननिर्मित हे मोबाईल ऑप्लिकेशन असून हिंदुस्थानविरोधात हा एक कुटील डावही असू शकतो असे याचिकेत म्हटले आहे. अशा व्हिडीओंमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानची प्रतिमा मलीन होत त्याचा परिणाम देशाच्या विकासावर होत आहे असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या