वादग्रस्त टीकटॉक व्हिडीओ प्रकरणी फैजल सिद्दीकीची चौकशी

टीकटॉकवर TikTok वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या फैजल सिद्दीकीची राबोडी पोलिसांनी चौकशी केली आहे. फैजलने एक व्हिडीओ पोस्ट केला होता जो अत्यंत आक्षेपार्ह होता. या व्हिडीओमुळे महिलांवर अॅसिड हल्ला किंवा तशाच पद्धतीच्या अत्याचारांना प्रोत्साहन मिळेल अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती. या व्हिडीओवरून पोलिसांनी त्याची तीन तास कसून चौकशी केली आहे.

पोलिसांनी स्वत:हून व्हिडीओची दखल घेत सिद्दीकी याला चौकशीसाठी बोलावले होते. सिद्दीकी हा गोरेगावला राहात असला तरी ही तक्रार राबोडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे, कारण फैजलचे आईवडील हे राबोडीमध्ये राहातात. फैजलचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून त्याला जेव्हा बोलावले जाईल तेव्हा हजर व्हावे लागेल अशी ताकीद देऊन परत पाठवण्यात आले आहे.

सिद्दीकी याने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की 14 सेकंदातील 9 सेकंदाचा व्हिडीओ कापून तो व्हायरल करण्यात आला. यामुळे गैरसमज पसरला असा सिद्दीकीने दावा केला आहे. सिद्दीकी याने या व्हिडीओमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल माफी मागत असल्याचं म्हटलं आहे. आपण अॅसिड हल्ल्यासारख्या गोष्टींचं कधीच समर्थन करणार नाही असंही त्याने म्हटलंय. जेव्हा पोलिसांनी आपल्याला चौकशीसाठी बोलावले तेव्हा घरचे चिंतेत पडले असल्याचं सिद्दीकीचं म्हणणं आहे. सिद्दीकी याने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये प्रेयसीने प्रेमसंबंध तोडल्याने तो एका मुलीवर काहीतरी द्रव पदार्थ फेकत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. हा द्रव पदार्थ चेहऱ्यावर पडल्यानंतर तो विद्रुप होतो असंही दाखवण्यात आलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या व्हिडीओची दखल घेत महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणी योग्य की कारवाई करण्याची विनंती करणारं पत्र लिहिलं होतं. या व्हिडीओमुळे वाद प्रचंड वाढल्याने टीकटॉकनेही हा व्हिडीओ डिलीट करून टाकला होता. फैजल सिद्धीकीची चौकशी झाल्याचे वृत्त मुंबई मिररच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या