मंगळवारपर्यंत साडेआठ हजार बेकायदा झोपड्य़ांवर हातोडा!

18

सामना प्रतिनिधी । मुंबई

वांद्रे गरीबनगर येथील झोपडपट्टीला गुरुवारी लागलेल्या भीषण आगीनंतर पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने पालिका प्रशासनाने बेकायदा बांधकामांवरील कारवाई तीव्र करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत तानसा पाइपलाइन परिसरातील तब्बल साडेआठ हजार बेकायदा झोपड्य़ांवर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, गुरुवारी लागलेल्या भीषण आगीमुळे अनधिकृत झोपड्य़ांवरील थांबवण्यात आलेली कारवाई उद्या पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

वांद्रे रेल्वे स्थानकाशेजारी दाटीवाटीने असलेल्या अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई करत असताना सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी पालिकेचे दोन जवान आणि एक नागरिक जखमी झाला. चार महिन्यांपूर्वी वांद्रे येथील तानसा पाइपलाइन फुटल्याने येथील परिसर जलमय झाला होता. यामध्ये दोन छोट्य़ा मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटनाही घडली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने अनधिकृत झोपड्य़ा हटवण्याचे काम सुरू केले आहे.

न्यायालयाच्या आदेशानेच कारवाई
तानसा पाइपलाइनच्या दुतर्फा दहा मीटर परिसरात असणाऱ्या बेकायदा झोपड्य़ा ३१ ऑक्टोबरपर्यंत हटवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार अनधिकृत झोपडपट्ट्य़ांवर ही कारवाई करण्यात येत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी बेकायदा झोपडपट्ट्य़ा उभारण्यात आल्या आहेत. या सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
– झोपडय़ांवरील कारवाईबाबत रहिवाशांना विचारले असता ते म्हणाले की, पालिकेने पाठवलेली नोटीस आम्हाला २५ ऑक्टोबरला रात्री उशिरा मिळाली. मात्र नोटीसनंतर २६ ऑक्टोबरला अचानक कारवाई करण्यात आली.

‘ते’ तिकीट घर तात्पुरते बंद
वांद्रे स्थानकाशेजारील गरीबनगर झोपडपट्टीला गुरुवारी लागलेल्या आगीमुळे वांद्रे पूर्वेकडील दक्षिण पादचारी पुलावरील तिकीट बुकिंग खिडकीला आगीची झळ बसल्याने ते पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या विभागाचा ताबा अग्निशमन दलाकडून मिळाल्यानंतर या प्रकरणात किती नुकसान झाले याचा अंदाज येईल असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. वांद्रे गरीबनगर झोपडपट्टीच्या आगीने वांद्रे पूर्वेचे दक्षिणेकडील तिकीट घर तात्पुरते (चार खिडक्या) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण दिशेकडील सहा मीटरच्या पादचारी पुलावर दोन एटीव्हीएम मशीन बसविण्यात आल्या आहेत. वांद्रे पश्चिमेकडे एक अतिरिक्त तिकीट खिडकी उघडण्यात आली आहे. पूर्वेकडील उत्तरेच्या पादचारी पुलावरही विरार दिशेकडील बुकिंग कार्यालयात एक अतिरिक्त खिडकी उघडण्यात आली आहे. तसेच मधल्या पादचारी पुलावर प्रवाशांसाठी दोन एटीव्हीएम मशीनही बसविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वांद्रे स्टेशनलगत असणाऱया अनधिकृत बांधकामांवर २०१५ पासून कारवाई सुरू आहे, मात्र येथील नागरिक पुन्हा अनेक मजल्यांची बेकायदा बांधकामे करतात. यामुळे स्टेशनलगतचा परिसर व्यापून गेला आहे. कालची कारवाई करण्याआधीसुद्धा पालिका प्रशासनामार्फत नोटीस देण्यात आली होती.
– पालिका अधिकारी

आपली प्रतिक्रिया द्या