छत्रपती शिवाजी टर्मिनसचे ‘घड्याळजी’ झाले निवृत्त

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेचं सर्वात गजबजलेलं आणि तितकंच ऐतिहासिक असं स्थानक म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी). या स्थानकाची इमारत म्हणजे मुंबईचा वैभवशाली इतिहास आहे. या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे इमारतीच्या छताजवळ लावलेलं घड्याळ. ब्रिटीशकाळात बसवलेलं हे लुण्ड आणि ब्लाकली कंपनीचं घड्याळ पाहून अनेक प्रवासी आपल्या घड्याळाची वेळ नीट करतात. मात्र, आजपासून ते घड्याळ रोजची टिकटिक करणार नाही. कारण, त्या घड्याळाचे पालक बंडू उर्फ बी. के. जाधव काल ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले आहेत.

मध्य रेल्वेच्या ऐतिहासिक वास्तुला लाभलेल्या अनेक परंपरांमध्ये वास्तुतल्या २७ घड्याळांचाही समावेश आहे. मुख्य इमारतीतील मोठे घड्याळ ९ फूट लांबीचे असून सीएसटीतील फलाट क्रमांक २ आणि ३ येथील घड्याळाचा आकार १४ फूट इतका आहे. ब्रिटीशांच्या कडक शिस्तीचा दाखला देत गेली १५० वर्षं उभ्या असणाऱ्या त्या घड्याळांना रोज तेलपाणी करणं, चावी देणं ही कामं गेली ३८ वर्षं बी. के. जाधव अव्याहतपणे करत होते.

१९७८ पासून रेल्वेच्या सेवेत असलेल्या जाधव यांच्यापूर्वी गिरगावातले चांदिवाले नावाचे एक कर्मचारी ते काम पाहत होते. चांदिवाले निवृत्त झाल्यावर हे काम जाधव यांनी सांभाळलं. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील मोठ्या घड्याळासह २७ घड्याळांना चावी देण्याचे काम जाधव करत होते. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ही जबाबदारी अद्याप कोणावरही सोपविण्यात आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या