चारशे ग्राम वजनाच्या जन्मलेल्या मुलीला वाचविण्यात डॉक्टरांना यश

42

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थानमधील उदयपूर येथे अवघ्या चारशे ग्राम वजनाच्या जन्मलेल्या मुलीला वाचविण्यात जिवांता रूग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे. ही मुलगी आता सात महिन्यांची झाली असून तिचे वजन तीन किलोच्या आसपास पोहोचले आहे. या मुलीचे नाव तिच्या आईवडीलांनी सीता असे ठेवले आहे. तब्बल २१० दिवस एनआयसीयूत मृत्यूशी आणि अनेक आजारांशी या मुलीने लढा दिला आहे. सीता हे हिंदुस्थानातील सर्वात कमी वजनाचे जगलेले बाळ आहे.

सीताच्या आईवडिलांच्या लग्नाला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण त्यांना मुलबाळ नसल्याने ते बरीच वर्ष मुलासाठी प्रयत्न करत होते. गेल्या वर्षी सीताची आई आय़व्हीएफ पद्धतीने गरोदर राहिली. मात्र त्या २२ आठवड्यांच्या गरोदर असतानाच त्यांचा रक्तदाब वाढून शरीरांतर्गत रक्तप्रवाह व्हायला लागला. त्यानंतर डॉक्टरांनी सिझेरियन करून प्रसूती केली. मात्र सीता अवघ्या ४०० ग्रामची जन्मली होती. डॉक्टरांनी सीतावर तत्काळ एनआयसीयूत उपचार सुरू केले. सीताच्या आई वडीलांनी देखील तिला वाचविण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्यानंतर तब्बल २१० दिवस मृत्यूशी लढा दिल्यानंतर सीता एनआयसीयुतून बाहेर आली व आपल्या घरी गेली. सध्या सीताचे वजन २.७ किलो झाले आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी पंजाबमध्ये ४५० ग्राम वजनाचे बाळ जगले होते. त्यामुळे आम्ही देखील सीताला वाचवायसाठी पूर्ण प्रयत्न केला. सीताच्या आई वडीलांनी देखील आमच्यावर विश्वास दाखवला. सीता जेव्हा जन्माला आली तेव्हा तिचा तळपाय माझ्या बोटाच्या नखा एवढा होता. त्यामुळे आम्ही तिला वाचवू शकलो. सीताच्या डोळ्यांवर व आतड्यांवर शस्त्रक्रीया झाली आहे तरी देखील त्या बाळाची जगण्याची इच्छा मोठी होती. त्यामुळे आमचे प्रयत्न सफल झाले. असे सीतावर उपचार करणाऱ्या डॉ. सुनील जांगेड यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या