आनंदी राहण्याची सूत्रे

जे पटेल तेच करा!

आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही, आवडली नाही, तरी आपण ती भिडेखातर करतो. त्याविरोधात काहीच बोलत नाही. पण त्या यशस्वी महिला तेथेच ठाम राहातात. आपल्याला जे चुकीचं वाटतंय तेथे त्या ते स्पष्टपणे बोलून दाखवतात. मला हे आवडलेले नाही, मी ते करणार नाही… असं ताडफाड राहिलं पाहिजे.

निर्भीड राहा

मनात भीती असते किंवा लाज वाटत असेल, पण काही स्रिया हळू बोलतात. तोंडातल्या तोंडात बोलतात. पण यावरूनच त्या आपल्या मतावर ठाम नाहीत हे स्पष्ट होतं. म्हणून जे बोलायचं ते स्पष्ट, ठाम आणि निर्भीडपणे बोला. समोरच्या व्यक्तीला ते आवडो की न आवडो… आपली ठाम मतं आपण त्याच्यासमोर मांडलीच पाहिजेत. मोठय़ा आवाजात बोललं पाहिजे. लोकांची भीडभाड मुळीच ठेवायची नाही.

आतला आवाज

मुळात आपल्या आंतरीक आवाजावर आपला विश्वास असायला हवा. समोर हा मोठा माणूस आहे म्हणून आवाजात दबकेपणा कशाला आणायचा…? ते कुणीतरी बोललंय ना… मनातला आतला आवाज… तो आपणही ऐकायचा. आपल्या मनात येईल तसं (पण अर्थात चांगलं) वागायचं… आपले म्हणणे जर चांगले असेल, योग्य असेल तर ते बेधडक व्यक्त करायचं.

स्वतःविषयी सकारात्मक राहा

स्वतःबद्दल चांगलेच बोला. समोरची व्यक्ती कितीही जवळची असली तरी आपणच स्वतःबद्दल वाईट बोलण्यामुळे त्या व्यक्तीची आपल्याबद्दलची प्रतिमा खराब होण्याची शक्यता असते.

स्वप्नांचा पाठलाग करा

मनात एक निश्चित असे स्वप्न, ध्येय धरून ठेवा. कधीतरी ते आपण मिळवणार आहोत ही खात्री बाळगा आणि ते स्वप्न पूर्ण झालंच आहे असाच विचार करत राहा. यामुळे खरंच आश्चर्यकारक परिणाम दिसेल. स्वप्ने खरोखर पूर्ण होताना दिसतील.

नाही म्हणायला शिका

अनेकदा ‘नाही’ म्हणता न आल्यामुळे आपण पटत नसलेले कामही करतो. पण ठामपणे ‘नाही’ म्हणायला शिका. मग पहा… परिणाम तुम्हाला स्पष्ट दिसेल. दुसऱ्याने त्याचे काम आपल्यावर थोपण्याचा प्रयत्न केला तर स्पष्ट शब्दात त्याला ‘मी ते करणार नाही’ असं सांगून मोकळ्या व्हा… तसंच ‘हो’ म्हणायलाही लाजू नका.

झेपेल तेवढेच करा

जे काम पेलता येणार नाही हे माहीत असते, ते उगाचच लाजेखातर किंवा भीतीपोटी करायला घेऊ नका. नंतर फजिती होण्यापेक्षा आधीच ‘मला ते जमणार नाही’ म्हणून ते काम दूर लोटा.

आपली प्रतिक्रिया द्या